नाशिक: रणजी ट्रॉफी २०२४-२५ चा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. महाराष्ट्र विरूध्द बडोदा सामना खेळवला जात आहे. या सामन्यापूर्वी महाराष्ट्रचा मधल्या फळीतील फलंदाज अंकित बावणेवर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे.
अंकित बावणेला मैदानावरील पंचांशी असहमती दर्शवल्याबद्दल एका सामन्याचे निलंबन देण्यात आले आहे. नाशिकमध्ये बडोदा विरुध्द रणजी ट्रॉफीच्या सहाव्या फेरोच्या अ गटातील सामन्यापूर्वी संघाला या निर्णयाची माहिती देण्यात आली. व्हाईट बॉल हंगामापूर्वी सर्व्हिसेसविरुध्दच्या पाचव्या फेरीच्या सामन्यात बाद झाल्यानंतर बावणेने मैदान सोडण्यास नकार दिल्याने खळबळ उडाली होती.
त्यानंतर सुमारे १५ मिनिट सामना थांबवण्यात आला, त्यानंतर सामनाधिकारी अमित शर्मा आणि महाराष्ट्राचे प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांच्या मध्यस्थीनंतर खेळ पुन्हा सुरू झाला. या घटनेनंतर कुलकर्णी यांनी देशांतर्गत क्रिकेटमधील पंचांच्या मानकांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले होते की, खेळाडूंच्या वर्तनासाठी दंड आकारला जातो, पण पंचांच्या योग्य मूल्यमापनाचे काय ? त्याच चुका करणारे पंच अंपायरिंग करून खेळ खराब का करत राहतात? जेव्हा अशा चुका वारंवार होतात, तेव्हा राग येणे स्वाभाविक आहे.


