मुंबई: विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या दहा टक्के आमदार असलेल्या पक्षाला विरोधी पक्षनेतेपद देण्याची तरतूद आहे. राज्यातील १५ व्या विधानसभेत एवढे संख्यावळ विरोधी बाकांवर बसलेल्या एकाही पक्षाकडे नाही. मात्र, निवडणुकीपूर्वी झालेल्या आघाडीमुळे त्यांच्याकडे एकत्रितपणे ४८ सदस्य आहेत. त्यामुळे आता विरोधी पक्षनेतेपद मिळण्याची शक्यता आहे. त्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला हे विरोधी पक्षनेतेपद मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
गेल्या सरकारमध्ये विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे, तर विधान परिषदेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे होते. काँग्रेसचे विजय वडेट्टीवार आणि विधान परिषदेत शिवसेनेचे अंबादास दानवे विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहत होते. दरम्यान, महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून अनिल परब, सुनील प्रभू तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, नसीम खान उपस्थित होते.


