मुंबई : विधानसभा निवडणुकीत लोकांनी आपल्यावर विश्वास दर्शवून मोठे बहुमत दिले आहे. त्यामुळे आपली जबाबदारी अधिक वाढली आहे. खात्याची कामे गतीने पूर्ण झाली पाहिजेत. त्यासाठी आठवड्यांतील किमान तीन दिवस मंत्रालयात उपस्थित राहा. उर्वरित ४ दिवसांत मतदारसंघ व बाहेरील दौऱ्याचे नियोजन करा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांना दिल्या आहेत.
विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर सत्तेवर आलेल्या महायुतीचे सरकार स्थिरस्थावर व्हायला तब्बल दीड महिना लागला आहे. सर्व मंत्र्यांनी खात्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांना पुढच्या काळात अधिक जबाबदारीने काम करण्याची सूचना दिली. मंत्री हा संपूर्ण राज्याचा असतो. त्यामुळे मंत्र्यांनी आपल्या वेळेचे योग्य नियोजन करावे. दर आठवड्यात किमान तीन दिवस मुंबईत थांबा. लोकांच्या कामासाठी मंत्रालयात भेटा. उरलेल्या दिवसांत मतदारसंघातील कामांचे नियोजन करा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांना दिल्याचे समजते.
कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना सेवा द्या
शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांसाठी पिण्याचे पाणी, प्रसाधनगृह स्वच्छ राहतील, हे सुनिश्चित करावे. अधिकाऱ्यांच्या अचानक भेटी होतील, त्यावेळी ते स्वच्छ दिसले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे यासाठी किमान दोन सुधारणा, नाविन्यपूर्ण उपक्रम आपल्या कार्यालयात राबविण्यात यावेत. प्रलंबित कामांची संख्या शून्यावर कशी येईल, याचा प्रयत्न करावा. अधिकारी नागरिकांना कधी उपलब्ध असतील याची माहिती फलकावर नमूद करा, अशा सूचना त्यांनी दिल्या.


