Parbhani Crime: जिल्ह्यातील मानवत शहरात दिवसाढवळ्या घडलेल्या एका धक्कादायक घटनेनं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. डी.फार्मसीचं शिक्षण घेणाऱ्या 19 वर्षीय विद्यार्थ्याचं अपहरण करून त्याच्याकडून खंडणी मागण्यात आली. पैसे न दिल्यामुळे त्याला थेट रेल्वे उड्डाणपुलावरून खाली फेकल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.
पीडित विद्यार्थी सय्यद सुफियान सय्यद शाकेर हा मानवत येथील फार्मसी महाविद्यालयात प्रथम वर्षात शिक्षण घेतो. सोमवारी सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास तो कॉलेजला जात असताना महाराणा प्रताप चौक परिसरात एक अल्टो कार त्याच्या जवळ येऊन थांबली. कारमधील मास्कधारी इसमांनी जबरदस्तीने त्याला गाडीत बसवत अपहरण केलं.
25 हजारांची खंडणी, न दिल्याने हल्ला
अपहरणानंतर आरोपींनी विद्यार्थ्याकडे 25 हजार रुपयांची मागणी केली. मात्र त्याच्याकडे पैसे नसल्याचं समजताच आरोपी संतापले. त्यांनी विद्यार्थ्याकडील असलेले 1 हजार रुपये काढून घेतले आणि त्याला बेदम मारहाण केली. यानंतर आरोपींनी मानवत रोडवरील रेल्वे उड्डाणपुलावर नेऊन विद्यार्थ्याला खाली फेकून दिलं. या अमानुष घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
दोन्ही पाय फ्रॅक्चर, मणक्याला गंभीर दुखापत
या हल्ल्यात विद्यार्थ्याचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले असून मणक्यालाही गंभीर दुखापत झाली आहे. जखमी अवस्थेत विद्यार्थ्याने आपल्या वडिलांशी संपर्क साधला. त्यानंतर त्याला तातडीने मानवत ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. प्राथमिक उपचारानंतर त्याची प्रकृती गंभीर असल्यामुळे पुढील उपचारासाठी परभणी येथे हलवण्यात आलं आहे.
गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
या प्रकरणी पोलिसांनी पीडित विद्यार्थ्याचा जबाब नोंदवला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगानं फिरवली आहेत. दिवसाढवळ्या अशा प्रकारे अपहरण आणि हल्ला झाल्यानं मानवत शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांनी कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.


