नागपूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा (एसटी बस) इलेक्ट्रिक बस प्रकल्प तोट्यात असल्याचा धक्कादायक दावा महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसकडून करण्यात आला. इलेक्ट्रिक बस प्रकल्पात एसटीचे सरासरी एका किलोमीटर मागे २० रुपये इतके नुकसान होत असल्याचे सांगण्यात येत आहे.
एसटी महामंडळाच्या इलेक्ट्रिक बस प्रकल्पाअंतर्गत एकूण १६८ बस सुरू आहेत. भविष्यात येणाऱ्या एकूण ५ हजार १५० बस पूर्णपणे एसटीच्या ताफ़्यात दाखल झाल्या व करारात ठरल्याप्रमाणे या प्रकल्पातील बस मार्गावर चालल्या नाहीत. तरी त्यांना प्रतीदिवस प्रतिबस ठरलेली ३२५ किलोमीटरची हमी रक्कम द्यावी लागेल. दरम्यान, ५ हजार १५० बसेस सरासरी १५.४५ लाख किमी अंतर चालल्या किंवा नाही चालल्या तरी किमान प्रतिदिवस प्रतिवस प्रती कि.मी. २० रुपये इतका तोटा होऊन सुमारे ३ कोटी २५ लाख रुपये इतका खर्च होईल आणि तेवढाच तोटा सहन करावा लागणार आहे.
भाडेतत्वावरील बस कंत्राटात हेराफेरी
एसटीच्या ताफ्यात नव्याने येणाऱ्या १ हजार ३१० भाडेतत्वावरील बस कंत्राटाच्या निविदेत हेराफेरी झाली व ऐनवेळी नियम व अटी विशिष्ट कंत्राटदारांना फायद्याच्या ठरतील, अशाच पद्धतीने टाकण्यात आल्याने शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे महामंडळाचे भविष्यात होणारे नुकसान टाळण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः हस्तक्षेप करून सदर प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारच्या परिवहन मंत्रालयाला दिले आहेत. आता इलेक्ट्रिक बस प्रकल्पाचे नुकसान टाळण्यासाठी चौकशी करावी, अशी मागणी बरगे यांनी केली.


