Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली असून भरधाव फॉर्च्यूनर कारने ट्रेलरला पाठीमागून धडक दिल्याने पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात दोन लहान मुले आणि कार चालक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बुलढाणा जिल्ह्यातील दुसरबीड परिसरात हा भीषण अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. सय्यद आसिफ सय्यद उमर हे पत्नी गुलसितान बी आणि कुटुंबीयांसह नागपूरहून संभाजीनगरकडे प्रवास करत होते. यावेळी त्यांच्या फॉर्च्यूनर कारने समोर धावणाऱ्या ट्रेलरला जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की डॉ. सय्यद आसिफ आणि त्यांच्या पत्नी गुलसितान बी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर कार चालक आणि दोन चिमुकले गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने जालना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या अपघातानंतर समृद्धी महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी भरधाव वेग आणि वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, मुंबईतही पावसादरम्यान पश्चिम द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात घडला. बोरिवलीतील देवीपाडा मेट्रो स्थानकाजवळ भरधाव टेम्पोने डिव्हायडर ओलांडून विरुद्ध मार्गिकेत प्रवेश करत अनेक वाहनांना धडक दिली. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले असून पोलिसांनी टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.


