नागपूर : कोविड-१९ नंतर आता आणखी एका धोकादायक विषाणूने लोकांच्या चिंता वाढवल्या आहेत. चीनमध्ये पसरलेल्या या नवीन विषाणूचे नाव ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) आहे. हा विषाणू वृद्ध आणि लहान मुलांमध्ये वेगाने पसरत असून याचे भारतासह अनेक देशांत रुग्ण आढळत आहेत. भारतात कर्नाटक, तामिळनाडू, राजस्थानात रुग्ण आढळले. आता महाराष्ट्रातही नागपुरात एचएमपीव्हीचे २ संशयित रुग्ण आढळले. दोन लहान मुलांचा रिपोर्ट एचएमपीव्ही पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये १४ वर्षीय मुलीचा समावेश आहे. दरम्यान, नागपूरचे जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांनी सर्व काही अंडर कंट्रोल आहे आणि घाबरण्याची गरज नाही, असे म्हटले आहे.
एचएमपीव्हीचा शोध २००१ साली लागला. ज्यामुळे प्रत्येक वयोगटातील लोकांत खालच्या आणि वरच्या श्वसनाचे आजार होऊ शकतात. परंतु हा विषाणू लहान मुलांसाठी आणि ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली नाही, त्यांच्यासाठी अधिक धोकादायक ठरू शकतो. कर्नाटकात याची २ रुग्ण आढळून आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार एचएमपीव्ही संसर्ग आधीच पसरत आहे आणि विविध देशांमध्ये संबंधित श्वसन रोगांची प्रकरणे नोंदवली गेली आहेत.
पुण्यात आधीच संसर्ग
पुण्यातील १३ टक्के बालकांना दोन वर्षांपूर्वीच एचएमपीव्ही व्हायरसचा संसर्ग झाला असून या व्हायरसला घाबरण्याची अजिबात गरज नाही, अशी माहिती जे. जे. रुग्णालयाच्या डीन डॉ. पल्लवी सापळे यांनी ही माहिती दिली.


