Bhandara Accident News : भंडारा जिल्ह्यात लग्न आटोपून परतणाऱ्या वऱ्हाड्यांवर काळाचा घाला घातला आहे. पवनी तालुक्यातील सौंदड परिसरात झालेल्या भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर २ जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये ४ महिलांचा आणि एका पुरुषाचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अड्याळ येथील वऱ्हाडी कोंढा येथून विवाह सोहळा आटोपून परतत होते. त्यावेळी त्यांच्या व्हॅनचा टायर फुटल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले आणि समोरून येणाऱ्या ट्रेलरवर ती जोरात आदळली. या भीषण धडकेत वाहनाचा अक्षरशः चुराडा झाला.
अपघातावेळी वाहनात एकूण ९ जण प्रवास करत होते. त्यापैकी ५ जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दोन जण गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी भंडाऱ्यात हलविण्यात आले आहे, तर अन्य दोघांवर अड्याळ ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.


