Pune News: “आधी रस्ता करायचा आणि मग जलवाहिनीसाठी तो उकरायचा” ही पुणे महानगरपालिकेची जुनी कार्यपद्धती आता एका नव्या स्तरावर पोहोचली आहे. हडपसर भागातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी जे उड्डाणपूल लवकरच जमीनदोस्त केले जाणार आहेत, चक्क त्याच पुलांच्या डागडुजीसाठी पालिकेने ५.८६ कोटी रुपयांची तिजोरी रिकामी करण्याचा घाट घातला आहे. महापालिकेच्या या विसंगत निर्णयामुळे करदात्या पुणेकरांच्या पैशांची अक्षरशः धूळधाण होत असल्याचे चित्र समोर आले आहे.
पाडल्या जाणाऱ्या पुलांचा ‘दुरुस्ती’ अट्टाहास
हडपसरमधील मगरपट्टा सिटी ते गाडीतळ या दरम्यानची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ‘भैरोबानाला ते यवत’ असा नवीन दुहेरी उड्डाणपूल आणि मेट्रो प्रकल्प नियोजित आहे. हा भव्य प्रकल्प उभारताना सध्याचे दोन्ही जुने उड्डाणपूल पाडले जाणार हे आधीच निश्चित झाले आहे. २०२५ मध्येच राज्याच्या पायाभूत प्रकल्प समितीने नवीन पुलाला मान्यता देऊन निविदा प्रक्रियाही सुरू केली आहे. असे असतानाही, पालिकेच्या स्थायी समितीने याच ‘मृत्युदंड’ मिळालेल्या पुलांच्या ५.८६ कोटींच्या दुरुस्ती प्रस्तावाला मंजुरी देऊन सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
करदात्यांच्या पैशांचा अपव्यय आणि संशयास्पद नियोजन
या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित होण्याचे मुख्य कारण म्हणजे, केवळ तीन वर्षांपूर्वीच या पुलांच्या दुरुस्तीवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले होते. ठाण्यातील एका खाजगी कंपनीला दिलेल्या नव्या कंत्राटात विस्तार सांधे (Expansion Joints), बेअरिंग बदलणे आणि कार्बन लॅमिनेटसारखी कामे समाविष्ट आहेत. पुढील काही महिन्यांत हे पूल पाडले जाणार असताना, हे तात्पुरते काम नेमके कोणाच्या फायद्यासाठी केले जात आहे, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. नवीन पुलाचे काम पूर्ण व्हायला जरी तीन वर्षे लागणार असली, तरी पाडकाम निश्चित असलेल्या स्ट्रक्चरवर इतका मोठा खर्च करणे म्हणजे प्रशासकीय नियोजनाचा मोठा अभाव मानला जात आहे.
प्रशासनाचा बचाव आणि पुणेकरांचा संताप
दुसरीकडे, महापालिका प्रशासनाने या खर्चाचे समर्थन केले आहे. वाढत्या वाहतुकीचा ताण आणि प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेता ही दुरुस्ती गरजेची असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. २०२६-२७ च्या अंदाजपत्रकात तशी तरतूदही करण्यात आली आहे. मात्र, महापालिकेचा हा अजब तर्क पुणेकरांना पटलेला नाही. एकीकडे मूलभूत सोयींसाठी निधीची कमतरता भासत असताना, दुसरीकडे पाडल्या जाणाऱ्या पुलांवर कोट्यवधींची उधळपट्टी करणे हा ‘अंधेर नगरी चौपट राजा’ असाच प्रकार असल्याचे बोलले जात आहे.


