Sanjay Gaikwad : दिवंगत लेखक गोविंद पानसरे यांच्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून सुरू झालेल्या वादानंतर संजय गायकवाड यांच्यावर टीकेची झोड उठली होती. प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोनवरून केलेल्या कथित शिवीगाळीनंतर गायकवाड यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केली. मात्र त्यानंतर आता त्यांच्या मुलाचा एक व्हिडिओ समोर आल्याने वाद अधिकच चिघळला आहे.
कुणाल गायकवाड यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यात ते कारच्या बोनेटवर उभे राहून विरोधकांवर अश्लील भाषेत टीका करताना दिसत असल्याचा दावा केला जात आहे. हा व्हिडिओ नगरपरिषद निवडणुकीदरम्यानचा असल्याचं सांगितलं जात असलं तरी तो पुन्हा व्हायरल झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, या व्हिडिओची अधिकृत पुष्टी झालेली नसली तरी बुलढाण्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर दीपक केदार यांनीही आक्रमक भूमिका घेत गायकवाड यांच्यावर टीका केली. “गरज पडली तर बुलढाण्यात ‘शिवीगाळ परिषद’ घेऊ,” असा इशारा देत त्यांनी राजकीय वातावरण आणखी तापवलं आहे.
सध्या या प्रकरणामुळे स्थानिक राजकारणात आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले असून, पुढील काही दिवसांत हा वाद अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


