आम आदमी पक्ष (AAP) ला मोठा राजकीय धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात असून, पक्षातील काही खासदार भारतीय जनता पक्ष (भाजप) च्या संपर्कात असल्याची चर्चा रंगली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, लोकसभेतील ‘आप’चे ३ पैकी २ खासदार भाजपशी संपर्कात असल्याचं सांगितलं जात आहे.
पंजाबमधील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपली राजकीय हालचाल वेगात केली असून, ‘आप’मध्ये फूट पाडण्याची रणनीती राबवली जात असल्याची चर्चा आहे. या घडामोडींमुळे भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर दबाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, राज्यसभेतही ‘आप’ला फटका बसल्याचं बोललं जात आहे. पक्षातील काही सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने एनडीएची ताकद वाढली असून, राज्यसभेतील भाजप सदस्यसंख्या ११३ पर्यंत पोहोचल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे एनडीएचं संख्याबळ अधिक मजबूत झालं आहे.
अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील पक्षासाठी ही घडामोड चिंतेची बाब मानली जात असून, पुढील काही दिवसांत पंजाबमधील राजकारणात आणखी मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एकूणच, पंजाबमध्ये राजकीय समीकरणं झपाट्याने बदलत असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी आपापल्या हालचालींना वेग दिला आहे.


