मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील धडाडीत नेते आणि शिवसेना (यूबीटी)चे खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीत अचानक गंभीर बिघाड झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदी बसवण्यात निर्णायक भूमिका बजावणारे राऊत आता पुढील दोन महिने पूर्णपणे सार्वजनिक जीवनापासून दूर राहणार आहेत. ते नव्या वर्षापासूनच राजकीय रिंगणात पुनरागमन करतील, असे त्यांनी स्वतः जाहीर केले आहे.
मात्र, मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक असताना, शिवसेना (यूबीटी)ची ‘धडाडती तोफ’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राऊतांच्या या ब्रेकमुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. राऊत यांनी काही तासांपूर्वीच आपल्या X हँडलवर कार्यकर्त्यांना उद्देशून एक भावनिक पत्रक प्रसिद्ध केले असून, त्यात प्रकृतीची गंभीर समस्या उद्भवल्याचे नमूद केले आहे.
संजय राऊतांच्या पत्रात नेमकं काय म्हटलंय?
सर्व मित्र परिवार आणि कार्यकर्त्यासाठी नम्र विनंती
जय महाराष्ट्र !
आपण सगळ्यांनी माझ्यावर कायम विश्वास ठेवला आणि प्रेम केले, पण सध्या अचानक माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरुपाचे बिघाड झाल्याचे समोर आले. उपचार सुरू आहेत, मी यातून लवकरच बाहेर पडेन. वैद्यकीय सल्ल्यानुसार मला बाहेर जाणे व गर्दीत मिसळणे यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यास नाईलाज आहे. मला खात्री आहे मी ठणठणीत बरा होऊन साधारण नवीन वर्षात आपल्या भेटीस येईन. आपले प्रेम आणि आशीवाद असेच राहू द्या.
कळावे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, राऊत यांच्या प्रकृतीवर परिणामकारक कारण म्हणजे सततच्या राजकीय दबाव आणि तणाव. अलीकडेच, ऑक्टोबर १३, २०२५ रोजी राऊत यांना फोर्टिस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, जेव्हा त्यांना अस्वस्थता आणि थकवा जाणवला होता. त्या वेळी त्यांना एंजिओग्राफी करण्यात आली होती आणि डॉक्टरांनी तणावामुळे ही समस्या उद्भवल्याचे सांगितले होते.
राऊत हे शिवसेना (यूबीटी)चे प्रवक्ते म्हणून महायुती सरकारवर सतत हल्ला करत असतात. कोरेगाव-भीमा दंगल प्रकरणातील नोटीस, मराठा आरक्षण आंदोलन आणि BMC निवडणुकीच्या तयारीमुळे त्यांच्यावर प्रचंड दबाव होता. यापूर्वी २०१९ मध्येही राऊत यांना छातीत दुखणे जाणवले असता लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, जेव्हा त्यांना एंजियोप्लास्टी करण्यात आली होती. तेव्हाही राजकीय संकटकाळात ही समस्या उद्भवली होती.


