Myanmar Blast : भारताच्या शेजारील म्यानमार मध्ये रविवारी भीषण स्फोटाची घटना घडली असून यात किमान ५५ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ७० हून अधिक जण जखमी झाले आहेत. या शक्तिशाली स्फोटामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला असून १०० हून अधिक घरे ढिगाऱ्याखाली गाडली गेल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
ही दुर्घटना ईशान्य म्यानमारमधील नामखम टाउनशिपच्या काउंगटुप गावात घडली. चीनच्या सीमेपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या या भागात खाणकामासाठी वापरण्यात येणारी स्फोटके साठवून ठेवलेल्या एका इमारतीत अचानक भीषण स्फोट झाला. स्फोट इतका तीव्र होता की आसपासची घरे आणि इमारती मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाली.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, बचाव पथके आणि वैद्यकीय कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.
स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी संबंधित इमारतीत खाणकामासाठी लागणारी स्फोटके साठवण्यात आली होती, अशी प्राथमिक माहिती आहे. हा परिसर TNLA या सशस्त्र गटाच्या नियंत्रणाखाली असून स्थानिक सुरक्षा यंत्रणांनी घटनेचा तपास सुरू केला आहे.
या दुर्घटनेनंतर संपूर्ण म्यानमारमध्ये शोककळा पसरली असून मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


