मुंबई: पवई परिसरात गुरुवारी लहान मुलांच्या अपहरणाच्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. आर.ए. स्टुडिओमध्ये स्वत:ला फिल्ममेकर म्हणवणाऱ्या रोहित आर्य या व्यक्तीनं 17 लहान मुलांसह 20 जणांना ओलीस ठेवून पोलिस प्रशासनाची झोप उडवली. मात्र, या घटनेदरम्यान आरोपी रोहित आर्यवर पोलिसांनी गोळीबार केला आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेत रोहित आर्यनं मृत्यूपूर्वी राज्य सरकारवर आणि विशेषतः शालेय शिक्षण विभागावर गंभीर आरोप केल्याने प्रकरणाला वेगळं वळण मिळाले आहे. या आरोपांवर माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे.
दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, मी त्या घटनेच्या वेळी मुंबईत असतो तर, जीवाची पर्वा न करता तिथे गेलो असतो. त्यांनी पुढे स्पष्ट केलं की, रोहित आर्यचं वर्तन चुकीचं होतं. पण जर त्याला खरंच शासनाकडून थकबाकी असती, तर त्याचा मार्ग कायदेशीर पद्धतीने काढता आला असता. मुलांना ओलीस धरून असा प्रकार करणं हे अजिबात योग्य नाही. यामुळे चुकीचा पायंडा पडू शकतो, असं केसरकर म्हणाले. त्यांनी याबाबत खेद व्यक्त करत सांगितलं की, पोलिसांनी अत्यंत धाडसीपणे सर्व मुलांची सुटका केली. हे समाधानकारक आहे. पण एका व्यक्तीचा अशाप्रकारे मृत्यू होणं हे दुःखद आहे.
रोहित आर्यनं मृत्यूपूर्वी सरकारकडे पैशांची थकबाकी असल्याचा आरोप केला. त्याने शिक्षण विभागावर दोन कोटी रुपयांची थकबाकी ठेवल्याचा गंभीर आरोप केला होता. तसेच, आपल्या स्वच्छता मॉनिटर नावाच्या प्रकल्पात शासनाने अन्याय केला असल्याचं त्याचं म्हणणं होते. या संदर्भात तो दोनवेळा उपोषणावरही बसला होता. मात्र, दीपक केसरकर यांच्या मते, ही थकबाकी असल्याचं सांगणं हे पूर्णपणे गैरसमजावर आधारित आहे. शासनाच्या निधीतून एवढी रक्कम एखाद्या व्यक्तीला थेट देण्यात येत नाही. त्या स्किममध्ये अनेक स्वयंसेवक, मुलं आणि खर्च समाविष्ट असतात. त्यांना काही अडचण असल्यास त्यांनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधायला हवा होता, मदत करण्याची तयारी नेहमीच असते.
केसरकर पुढे म्हणाले की, त्यांचं म्हणणं असं होतं की त्यांनी वेबसाईट सक्रिय केली आणि त्यासाठी काही मुलांकडून पैसे घेतले. त्यामुळे विभागाचं म्हणणं असं होतं की, त्यांनी ते पैसे मुलांना परत करावेत आणि भविष्यात असं पुन्हा होणार नाही याचं लेखी आश्वासन द्यावं. त्यांनी हे केलं असतं तर, त्यांच्या बिलाच्या प्रक्रियेत अडचण आली नसती. त्यांनी स्पष्ट सांगितलं की, शासनाचे काही नियम असतात आणि त्याचं पालन करूनच कोणालाही मोबदला मिळू शकतो. अन्यथा त्यासाठी औपचारिक प्रक्रिया पार पाडावी लागते. केसरकर यांनी सांगितलं की, त्यांनी रोहितला वैयक्तिकरित्या काही मदत केली होती, कारण त्यावेळी तो वैफल्यग्रस्त दिसत होता, मात्र त्याच्याकडून झालेलं हे कृत्य माफ करता येणार नाही.
एका वेब सीरिजसाठी ऑडिशन
ही संपूर्ण घटना कशी घडली, याचं चित्र आता हळूहळू स्पष्ट होत आहे. पवईतील महावीर क्लासिक बिल्डिंगमधील आर.ए. स्टुडिओमध्ये मागील काही दिवसांपासून एका वेब सीरिजसाठी ऑडिशन चालू होतं. 17 मुलांचं अंतिम निवड प्रक्रियेत नाव आलं होतं आणि त्यामुळे काही पालकही तिथे उपस्थित होते. गुरुवारी दुपारी मुलं आत गेल्यानंतर काही वेळानं त्यांनी काचेतून हात हलवत काहीसं विचित्र इशारे देणं सुरू केलं. पालकांना काहीतरी गडबड जाणवली आणि तातडीने पोलिसांना बोलावण्यात आले. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना लक्षात आलं की, ही साधी ऑडिशन नसून ओलीस प्रकरण आहे. त्यानंतर मुंबई पोलिस, शीघ्रकृती दल आणि अग्निशमन दलाने मोठी मोहीम उघडली.
सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून प्रत्युत्तरादाखल गोळी झाडली
या थरारक कारवाईदरम्यान पोलिसांनी कौशल्य आणि संयमाचं दर्शन घडवलं. एका बाजूने पोलिसांनी रोहित आर्यशी संवाद साधत त्याला गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न केला, तर दुसऱ्या पथकाने मागच्या बाजूच्या खिडकीतून आत शिरून मुलांची सुटका सुरू केली. मात्र, अचानक रोहित आर्यनं पोलिसांवर फायरिंग करण्याचा प्रयत्न केला आणि मुलांच्या डोक्याला बंदूक लावून धमकावलं. त्या क्षणी पवई पोलिस स्टेशनचे एपीआय अमोल वाघमारे यांनी सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून प्रत्युत्तरादाखल गोळी झाडली. ती गोळी रोहितच्या छातीत लागली. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, पण संध्याकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळावरून पिस्तुल, पेट्रोल, ज्वलनशील पदार्थ आणि लायटर जप्त केले असून, या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
या घटनेनंतर राज्यातील प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. एका बाजूला पोलिसांच्या धाडसी कारवाईचं कौतुक होत असतानाच, दुसरीकडे शासनाच्या प्रणालीविषयी प्रश्न उपस्थित होत आहेत. दीपक केसरकर यांनी या प्रकरणातून एक महत्त्वाचा संदेश दिला, शासनाशी संबंधित प्रश्नांचा तोडगा संवादातून निघू शकतो, पण शस्त्र उचलून नाही. त्यांनी रोहित आर्यच्या कुटुंबीयांबद्दल सहानुभूती व्यक्त करत सांगितलं की, जर खरंच त्यांचे काही पैसे थकले असतील, तर ते शासनाकडून त्याच्या कुटुंबीयांना मिळावेत, यासाठी मी स्वतः प्रयत्न करेन.


