मुंबई: पवई परिसरात आरए स्टुडिओ येथे 17 लहान मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचा अखेर एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला. या घटनेनंतर आता रोजच या प्रकरणात नवे खुलासे होत आहेत. त्याने 17 मुलांना ओलीस ठेवण्यापूर्वी एक व्यवस्थित योजना तयार केली होती. पोलिसांच्या तपासानुसार, त्याने चित्रपट ऑडिशनच्या नावाखाली अनेकांना आरए स्टुडिओत बोलावण्याचा प्लॅन तयार केला होता. या फसव्या ऑडिशनच्या नावाखालीच त्याने मुलांना बोलावले आणि ओलीस ठेवले. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या प्लॅनचा भाग म्हणून त्याने मराठी अभिनेत्री ऋचिता जाधवलाही स्टुडिओत बोलावले होते. चित्रपटात कामाची संधी देण्याच्या नावाखाली त्याने तिला बोलावले. मात्र, वैद्यकीय कारणामुळे ऋचिता त्या दिवशी जाऊ शकली नाही.
अभिनेत्री ऋचिता जाधवने वृत्त वाहिणीशी बोलताना या घटनेची सविस्तर माहिती दिली. रोहित आर्याने मला 4 ऑक्टोबर रोजी मेसेज केला होता. तो म्हणाला, मी एक चित्रपट बनवतोय, आणि त्याबाबत तुझ्याशी बोलायचं आहे. संध्याकाळी आमचा जवळपास नऊ मिनिटांचा फोनवर संवाद झाला. त्याने मला सांगितलं की चित्रपटाची कथा एका चांगल्या माणसाभोवती फिरते, जो दहशतवादी नसतो पण सरकारकडे काही मागण्या ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांना डांबून ठेवतो. त्याचा हेतू चुकीचा नसतो, तो फक्त आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचवू इच्छितो, अशी माहिती ऋचिताने दिली. या कथेतूनच प्रत्यक्षात त्याने आखलेला ओलीस प्रकरणाचा आराखडा समोर येतो, असं निरीक्षण पोलिसांनी नोंदवलं आहे.
वेडनेसडे, या हिंदी चित्रपटाचेही दिले उदाहरण
पुढे ऋचिता म्हणाली, मी त्याला विचारलं की या कथेत माझी भूमिका काय असेल? त्यावर त्याने सांगितलं, तू शिक्षिकेची किंवा विद्यार्थ्यांच्या पालकाची भूमिका करशील, जिला अपहरणकर्त्याच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवायच्या असतील. हे ऐकून मी विचार करण्यासाठी वेळ मागितला. त्याने सांगितलं की ऑडिशन्स लवकरच सुरू होणार आहेत आणि भेटायला ये. इतकंच नव्हे तर त्याने वेडनेसडे या हिंदी चित्रपटाचं उदाहरण देत सांगितलं की माझा चित्रपट त्याच धर्तीवर असेल. इतक्यावरच न थांबता त्याने दिवाळीच्या काळातही तिला मेसेज करून शुभेच्छा दिल्या. मी प्रतिसाद दिला नाही, पण 27, 28 किंवा 29 ऑक्टोबर रोजी भेटायचं का, असा त्याचा मेसेज आला. मी 28 तारखेला भेटू असं सांगितलं, आणि त्याने आरए स्टुडिओचं गुगल लोकेशन पाठवलं, असं ऋचिताने सांगितलं.
ऋचिताने पुढे सांगितले की, मात्र सुदैवाने माझे सासरे राजेंद्र माने आजारी पडल्याने आम्ही रुग्णालयात होतो. त्यामुळे मी त्याला मेसेज करून सांगितलं की मी येऊ शकत नाही. आपण 15 नोव्हेंबरनंतर भेटू, असं सांगितलं. त्यावर त्याचा शेवटचा मेसेज होता, टेक केअर. त्या नंतर त्याच्याकडून कोणताही संपर्क आला नाही. आणि काही दिवसांनी हे भयानक वृत्त ऐकून मी हादरले.


