कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आणि महाराष्ट्र केसरी विजेता पैलवान सिकंदर शेख याला पंजाब पोलिसांनी अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात अटक केली आहे. प्राथमिक तपासात राजस्थानमधील कुख्यात पपला गुर्जर टोळीशी त्याचा संबंध असल्याचे उघड झाले असून, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातून शस्त्रे मिळवून पंजाबमधील गुन्हेगारी गटांना पुरवठा करत असल्याचा आरोप आहे.
पोलिसांच्या सीआयए पथकाने २४ ऑक्टोबरला मिळालेल्या खबरीच्या आधारे खरर-मुल्लानपूर-एअरपोर्ट रोडवर कारवाई करत सिकंदरसह चार जणांना पकडले. यामध्ये उत्तर प्रदेशातील शेरगढ चौरा येथील दनवीर (२६) आणि बंटी (२६), तसेच पंजाबमधील नद्दा गावचा कृष्ण कुमार उर्फ हॅपी गुर्जर (२२) यांचा समावेश आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून पाच पिस्तुले, जिवंत काडतूस, २ लाख रुपये रोख रक्कम आणि दोन वाहने जप्त केली आहेत.
सदर खरर पोलिस ठाण्यात शस्त्र कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवण्यात आली असून, तपास सुरू आहे. पोलिस सूत्रांनुसार, तो स्थानिक नेटवर्कसाठी शस्त्रे खरेदी करत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, सिकंदरच्या कुटुंबीयांनी खोट्या गुन्ह्यात त्याला अडकवले जात असल्याचा दावा केला असून, बोलण्यास नकार दिला आहे. या घटनेमुळे महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
पुण्यातील महाराष्ट्र केसरी २०२३ च्या माती गटातील अंतिम लढतीत पंचांच्या निर्णयामुळे वाद झाला होता, ज्यामुळे सोशल मीडियावर सिकंदरच्या बाजूने मोठे ट्रोलिंग झाले आणि राज्यभरात चर्चा रंगली होती. त्यानंतर २०२४ मध्ये त्याने महाराष्ट्र केसरीचा मानाचा गदा जिंकला. पंढरपूरजवळील भीमा साखर कारखान्यावर आयोजित भीमा केसरी स्पर्धेदरम्यान बोलताना सिकंदरने “मी जनतेच्या मनातील महाराष्ट्र केसरी आहे” असे वक्तव्य केले होते. भाजप खासदार धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा झाली होती.
सिकंदरच्या अटकेनंतर कुस्ती क्षेत्रात त्याच्या बाजूने आणि विरोधात प्रतिक्रिया उमटत आहेत. पंजाब डीजीपी गौरव यादव यांनी सांगितले की, हे नेटवर्क हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये सक्रिय असून, अधिक तपासात व्यापक संबंध उघड होण्याची शक्यता आहे. याप्रकरणी लवकरच अधिक माहिती समोर येईल.


