Khed Nagarparishad Election 2025 : महाराष्ट्रातील २८८ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला वेग दिला असून, स्थानिक पातळीवर आघाड्यांमध्ये फूट पडण्याची शक्यता वाढली आहे. महायुतीला याचा सर्वाधिक फटका बसण्याची चिन्हे दिसत आहेत. यात रत्नागिरी-सिंधुदुर्गसह पुण्यातील खेड नगरपरिषदेची भर पडली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून खेडवर रामदास कदम आणि त्यांचे पुत्र योगेश कदम यांचे वर्चस्व असले तरी, आता पूर्वीचे मनसे नेते आणि नुकतेच भाजपमध्ये दाखल झालेले वैभव खेडेकर (Vaibhav Khedkar) यांनी कदम पितापुत्राच्या सत्तेला धक्का देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. महायुतीच्या सीट वाटपाबाबतची चर्चा होण्यापूर्वीच भाजप आणि शिंदे शिवसेनेने खेड नगराध्यक्षपदासाठी वेगवेगळे उमेदवार ठरवले असल्याने आघाडीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे.
वैभव खेडेकरांचा ‘फॅमिली कार्ड’ डाव: पत्नी वैभवींचे ब्रँडिंग
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून (मनसे) हकालपट्टी झालेल्या वैभव खेडेकर यांना भाजप प्रवेशासाठी बराच काळ संघर्ष करावा लागला. अखेर प्रवेश मिळताच त्यांनी खेडमध्ये जोमदार मोहीम सुरू केली. कदम कुटुंबाच्या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी वैभव यांनी पत्नी वैभवी खेडेकर (Vaibhavi Khedkar) यांचे नगराध्यक्षपदासाठी ब्रँडिंग सुरू केले आहे.
खेडमधील कार्यकर्त्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुप्स आणि सोशल मीडियावर वैभवी यांचे ‘नगराध्यक्ष वैभवी खेडेकर’ असा उल्लेख असलेले फोटो आणि मेसेजेस व्हायरल होत आहेत. हे ब्रँडिंग भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या मागेपुढे न करता वैभव यांनी स्वतंत्रपणे राबवले असून, यामुळे कदम पितापुत्र आणि शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
दुसरीकडे, शिंदे शिवसेनेने खेड नगराध्यक्षपदासाठी माधवी बुटाला (Madhvi Butala) यांचे नाव पुढे केले आहे. कदम कुटुंबाच्या प्रभावाखाली असलेल्या या मतदारसंघात दोन्ही पक्ष वेगळे उमेदवार उभे करत असल्याने महायुतीची एकजूट धोक्यात सापडली आहे. खेड नगरपरिषदेत सुमारे ३० जागा असून, यंदा मतदान २ डिसेंबरला होईल.
वैभव यांनी काही दिवसांपूर्वी खेडमधील एका कार्यक्रमात रामदास कदम यांना ‘जुने वाद विसरा’ म्हणत महायुतीत सामील होण्याचे आवाहन केले होते. मात्र, आता त्यांच्याच डावाने कदम गटाला धक्का बसला आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, वैभवी यांचा उमेदवारीचा अर्ज दाखल झाल्यास शिंदे गटाने काय पाऊल उचलावे, यावर महायुतीची कोकणमधील रणनीती अवलंबून असेल.


