पुणे: दिल्लीतील बॉम्बस्फोटाच्या घटनेनंतर देशभरात सुरक्षा यंत्रणा अलर्टवर आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पुण्यातील कोंढवा परिसरात दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) बुधवारी सकाळी मोठी छापेमारी केली. एका संशयित व्यक्तीवर कारवाई करताना पथकाने त्याच्या घराची झडती घेतली. त्याच्याकडून लॅपटॉप, हार्डडिस्क आणि काही इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली आहेत.
सुरक्षा सूत्रांच्या माहितीनुसार, संबंधित व्यक्तीचा दिल्ली स्फोटाशी संबंधित दहशतवादी जुबेर हंगरगेकर याच्याशी संपर्क असल्याचा संशय आहे. तपास अधिकाऱ्यांनी त्या व्यक्तीची चौकशी सुरू केली असून, अद्याप त्याला अधिकृत ताब्यात घेतलेले नाही. जप्त केलेली इलेक्ट्रॉनिक सामग्री फॉरेन्सिक तपासासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आली आहे. या उपकरणांमधून मिळणाऱ्या माहितीनंतर आरोपींच्या संभाव्य नेटवर्कचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
याआधी एटीएसने ठाण्यातील मुंब्रा परिसरातही छापेमारी करून एका शिक्षकाच्या घराची झडती घेतली होती. तो शिक्षक जमात-ए-इस्लामी या संघटनेशी संबंधित असल्याची माहिती समोर आली होती. त्याच्या घरातूनही मोबाईल फोन आणि काही डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले आहेत.
हेही वाचा – दिल्ली लाल किल्ला नाही तर आयोध्येतील राम मंदिर खरं टार्गेट; तपासात धक्कादायक माहिती
दरम्यान, दिल्ली स्फोटानंतर दहशतवादी संघटना “व्हाईट कॉलर मॉड्यूल” सक्रिय करण्याच्या तयारीत असल्याचा अंदाज तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे देशातील सर्व प्रमुख शहरांमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील छापेमारीने पुन्हा एकदा दहशतवादी हालचालींबाबत चिंता वाढवली आहे.


