Flood Relief Decision: राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून दिलासादायक निर्णय जाहीर करण्यात आला आहे. अतिवृष्टीमुळे वाहून गेलेल्या किंवा खोल खड्डे पडलेल्या शेतजमिनींच्या पुनर्वसनासाठी मोफत माती, गाळ, मुरूम आणि कंकर उपलब्ध करून देण्याचे आदेश महसूल विभागाने दिले आहेत. जमिनींची सुपीकता पुन्हा सुधारण्यासाठी या खनिजांवरील रॉयल्टीही माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारने हा निर्णय तत्काळ अंमलात आणावा, असे निर्देश राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले असून, त्यामुळे पूरग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
अनेक जिल्ह्यांत शेती उद्ध्वस्त
ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या प्रचंड पावसाने राज्यातील सुमारे 30 जिल्ह्यांना मोठा फटका बसला. महापूर आणि जोरदार पावसामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून लाखो हेक्टरवरील खरीप पिके नष्ट झाली आहेत. सोलापूरसह अनेक जिल्ह्यांत नद्यांनी दिशा बदलल्याने शेतजमिनी वाहून गेल्या, तर अनेक ठिकाणी 10 ते 15 फुट खोल खड्डे पडल्याचे निदर्शनास आले.
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन महिन्यांत राज्यातील 1,785,714 हेक्टर (4,284,846 एकर) क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित झाले आहे. सोयाबीन, कापूस, मका, तूर, उडीद, मूग, भाजीपाला, फळपिके, ऊस, कांदा, ज्वारी आणि हळद या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
या जिल्ह्यांना सर्वाधिक फटका
नांदेड – 728,049 हेक्टर
यवतमाळ – 318,860 हेक्टर
वाशीम – 203,098 हेक्टर
अकोला – 177,466 हेक्टर
धाराशिव – 157,610 हेक्टर
बुलढाणा – 89,782 हेक्टर
सोलापूर – 47,266 हेक्टर
एकूण 195 तालुके आणि 654 महसूल मंडळांमध्ये खरीप पिकांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे.


