Satara Nagaradhyaksha Election: राज्यभरात निवडणुकांचा माहोल चांगलाच तापला आहे. बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होताच एनडीएने स्पष्ट आघाडी घेतली आणि अखेर विजय मिळवला. सकाळपासूनच झालेल्या चुरशीच्या मतमोजणीनंतर आलेल्या या निकालाने आता देशभरातील राजकीय वातावरण आणखी रंगतदार झाले आहे. यानंतर महाराष्ट्रातही सर्वांचे लक्ष आगामी नगरपालिका, महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे वळले आहे. विविध पक्षांनी राज्यभरात तयारीचा वेग वाढवला असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत अगदी जवळ आली आहे.
दरम्यान, राज्यातील 246 नगरपालिकांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. अशातच मनोरंजनविश्व आणि राजकारणातील एक मोठी बातमी समोर आली आहे. ‘बिग बॉस’ फेम अभिजीत बिचुकले यांनी सातारा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल केली आहे. काही वर्षांपूर्वी बिग बॉसमधून बाहेर पडताच त्यांनी राजकारणात प्रवेश केला. राष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा आणि विधानसभा अशा विविध निवडणुकांत पराभवाचा सामना करूनही बिचुकले पाठीमागे हटले नाहीत. आता ते पुन्हा एकदा साताऱ्यातील नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात उतरणार आहेत.
हेही वाचा – मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचा ‘एकला चलो रे’चा नारा
अभिजीत बिचुकले यांचा मुकाबला यावेळी भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या गटाशी होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, ‘सातारा नगरपालिका माझ्यासाठी मातृसंस्था आहे. इथंच मी नोकरी केली, पण काही स्वार्थी लोकांनी माझ्या पत्नी अलंकृता बिचुकले यांच्या प्रचारात सहभागी झालो म्हणून मला नोकरीतून बाहेर काढलं. हा प्रचंड अन्याय मी कधी विसरलो नाही. आता हीच संस्था शुद्ध करण्याची जबाबदारी मी स्वतःवर घेतली आहे.’
ते पुढे म्हणाले, ‘सातारकरांनो, गेल्या 25 वर्षांत साताऱ्यातील खड्डे, बागा आणि मूलभूत सुविधांची जी अवस्था झाली आहे ती मी प्रत्यक्ष पाहिली आहे. लोकसभा–विधानसभेत तुमचे प्रेम मिळालं, पण आता एकच विनंती, हे नगराध्यक्षपद मला द्या. सातारा ‘सितारा’ करण्याची ताकद माझ्यात आहे आणि ती मी दाखवूनही देईन. ही माझ्यासाठी ‘डू ऑर डाय’ची लढाई आहे.’


