Balasaheb Thackeray Smrutidin: स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 13 व्या स्मृतीदिनानिमित्त आज (17 नोव्हेंबर) दादर येथील स्मृतीस्थळी भाविकांची गर्दी पाहायला मिळाली. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे हे दोघेही सकाळी स्मृतीस्थळी उपस्थित राहिले. जवळपास 11 वर्षांनी दोन्ही भाऊ एकत्र बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी दिसल्याने शिवसैनिकांसह सर्वांचे लक्ष या क्षणाकडे वेधले गेले. या भेटीनंतर राज ठाकरेंनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. तसेच भाजप तसेच शिंदे गटावर अप्रत्यक्षपणे टीका केली.
हिंदुत्व ही बाळासाहेबांसाठी अस्मिता, मतांचा व्यवसाय नव्हता – राज ठाकरे
राज ठाकरे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले की, शिवसेना पक्षाचे संस्थापक, हिंदुहृदयसम्राट आणि माझे काका स्व. बाळासाहेब ठाकरे यांची आज पुण्यतिथी. देशाच्या इतिहासात भाषिक अस्मितेच्या जोरावर एक प्रचंड चळवळ निर्माण करून त्यातून एका राजकीय पक्षाला जन्म देणारे बाळासाहेब. आणि पुढे जातीय अस्मिता तीव्र होण्याच्या काळात आणि भारतीय जनता पक्षाचा कमंडलवाद फोफावायच्या आधी हिंदू म्हणून अस्मिता जागी करणारे बाळासाहेबच.
हेही वाचा – ‘काम करायची इच्छा नसेल तर पद सोडा’, राज ठाकरेंनी पुण्यातील शाखा अध्यक्षांना फटकारले
राज ठाकरे यांनी पुढे म्हटलं आहे की, ‘पण म्हणून बाळासाहेबांनी हिंदूंकडे व्होटबँक म्हणून नाही पाहिलं. त्यांच्यासाठी हा विषय अस्मितेचा होता, धर्माप्रतीच्या प्रेमाचा होता. आणि हे करताना बाळासाहेबांनी, प्रबोधनकारांकडून आलेला तर्कवाद पण सोडला नाही. बाळासाहेब हे कमालीचे हिंदुप्रेमी होते, पण म्हणून त्यांच्यातली चिकित्सक वृत्ती लोप पावली नाही. त्यामुळे बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मिरवणाऱ्यांची किंवा त्यावर मतं मागणाऱ्यांची गंमत वाटते. ना त्यांना बाळासाहेब माहित आहेत, ना त्यांना प्रबोधनकार माहित आहेत, ( अर्थात ऐकणं आणि वाचणं यांचा दुष्काळ असल्यामुळे ) त्यामुळे त्यांना बाळासाहेबांच्या विचारांची झालेली मशागत किती समृद्ध होती ह्या पुसटशी देखील कल्पना नाही !’
फक्त मतं, सत्ता मिळवणे आणि ती सत्ता मिळाल्यावर वाट्टेल तसं ओरबाडणं म्हणजे राजकारण हे रूढ होत असताना, समाजकारण आधी आणि मग राजकारण हे आमच्या विचारात रुजवणाऱ्या बाळासाहेबांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विनम्र अभिवादन, असं म्हणत राज ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटाला टोला लगावला आहे.


