चंद्रपूर: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना वेग आला असून, निवडणूक आयोगाने नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी अधिकृत कार्यक्रम जाहीर केला आहे. जाहीर वेळापत्रकानुसार, २ डिसेंबर रोजी मतदान तर ३ डिसेंबरला मतमोजणी पार पडणार आहे. दरम्यान, उमेदवारी अर्जाचा आज शेवटचा दिवस असल्याने राजकीय हालचालींना मोठा वेग आला आहे. इच्छुक उमेदवार एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करत असल्याने पक्षश्रेष्ठींना शेवटच्या क्षणी उमेदवार निवडीची कसरत करावी लागत आहे.
निवडणुकीची घोषणा होताच सर्वाधिक पक्षांतरे भाजपात झाल्याचे चित्र दिसले. भाजपा, राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील मित्रपक्ष समीकरणांमध्येही हालचाली वाढल्या. अशातच चंद्रपूर जिल्ह्यातून भाजपसाठी मोठा धक्का समोर आला आहे. जिल्ह्यातील चार नगरपरिषदांमध्ये भाजपच्या अधिकृत उमेदवारांविरोधात बंडाची लाट उसळली आहे.
हेही वाचा –इंदापूरमध्ये कृष्णा-भिमा स्थानिक विकास आघाडी स्थापन; वरिष्ठ नेत्यांसोबतच्या चर्चेनंतर मोठा निर्णय
चंद्रपूर जिल्ह्यातील बंडखोरीची परिस्थिती
भद्रावती: भाजप शहराध्यक्ष सुनील नामोजवार यांनी अचानक काँग्रेसमध्ये प्रवेश करून तेथून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळवली.
राजुरा: भाजपचे नगरसेवक राजेंद्र डोहे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आणि त्यांनाही नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आली.
वरोरा: भाजपाच्या अधिकृत उमेदवार माया राजुरकर यांच्याविरोधात बंडखोर वसुधा वरघणे रिंगणात उतरल्या.
गडचांदूर: अधिकृत उमेदवार अरुण डोहे यांच्या विरोधात निलेश ताजणे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून सरळ आव्हान दिले आहे.
या सर्व घडामोडींमुळे भाजपसमोर मोठे राजकीय आव्हान उभे राहिले आहे, तर जिल्ह्यातील निवडणुकीचा सामना अधिक चुरशीचा होण्याची शक्यता आहे.


