नवी मुंबई : नेरूळ येथील राजीव गांधी उड्डाणपूलाजवळील छत्रपती शिवाजी महाराज चौकात नवी मुंबई महानगरपालिकेने उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनारुढ पुतळ्याचे अनावरण गेल्या सहा महिन्यांपासून रखडले होते. घाणेरड्या, धुळीने माखलेल्या कापडाने झाकलेल्या या पुतळ्याचे रविवारी (१६ नोव्हेंबर) मनसे नेते अमित ठाकरे यांनी सहकाऱ्यांसह अचानक अनावरण केले.
यावेळी पोलिसांशी झटापट होताना दिसली आणि नेरूळ पोलीस ठाण्यात अमित ठाकरे तसेच ७० मनसे कार्यकर्त्यांवर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल झाले. मात्र, अनावरणाला केवळ २४ तासही पूर्ण होत नाही तोच सोमवारी (१७ नोव्हेंबर) महापालिकेने पुतळा पुन्हा कापडाने झाकून ठेवला, यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
अनावरणापूर्वी पाण्याने धुवून आरती
अमित ठाकरे हे नवी मुंबईत मनसे शाखांच्या उद्घाटनासाठी आले होते. तेव्हा नेरूळमधील या पुतळ्याची दुरवस्था पाहून त्यांना संताप आला. सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली पोलिस फौजफाटा तैनात असतानाही त्यांनी सहकाऱ्यांसह पुतळ्यापर्यंत धाव घेतली. पुतळ्यावरील धुळीने माखलेला कापड काढून, पाण्याने धुवून, जलाभिषेक करून पुष्पहार अर्पण केला आणि विधिवत आरती घालून अनावरण केले. “महाराजांचा पुतळा घाणेरड्या कापडात गुंडाळून ठेवला होता, धूळ बसली होती. मी फक्त तो काढला,” असे अमित ठाकरे यांनी सांगितले.
माझ्या राजकीय आयुष्यातील पहिली केस महाराजांसाठी
नेरूळ पोलीसांनी अमित ठाकरे व ७० मनसे कार्यकर्त्यांवर पोलिसांना अडवल्याबद्दल, सार्वजनिक मालमत्तेला धक्का लावल्याबद्दल व इतर कलमांतर्गत गुन्हे दाखल केले. यावर अमित ठाकरेंनी सोमवारी पत्रकार परिषदेत भाष्य केले, “छत्रपती शिवाजी महाराजांसाठी माझ्यावर गुन्हा दाखल झाला याचा मला अभिमान आहे.
माझ्या राजकीय आयुष्यातील ही पहिली केस आहे आणि ती महाराजांसाठी आहे. कबुतरांसाठी गुन्हे दाखल होतात, तर महाराजांसाठी का होणार नाही? माझे भाग्य आहे की माझ्या हाताने अनावरण झाले. त्यांनी पुढे सांगितले, “मंत्र्यांना वेळ नाही म्हणून अनावरण रोखले का? पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन करायला आले, दहिहंडीला नेते आले, पण महाराजांसाठी कोणीच वेळ काढला नाही.
पुन्हा कापडाने झाकला पुतळा
अनावरणानंतर अवघ्या २४ तासांत महापालिकेने पुतळा पुन्हा कापडाने झाकून ठेवला. यावर मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी आरोप केला, महानगरपालिकेने छत्रपतींना बंदीस्त करून हे मोगलाई सरकार असल्याचे सिद्ध केले. गेल्या वर्षी फेब्रुवारीपासून आम्ही अनावरणाची मागणी करत आहोत, पण पालिकेच्या अधिकार्यांनी दुर्लक्ष केले. हा ४६ लाख रुपयांचा पुतळा धुळीत माखलेला होता, हे अपमान आहे.
अमित ठाकरेंनी देखील म्हटले, माझ्या सहकाऱ्यांसह विधिवत आरती करून लोकार्पण केले, पण आज पुन्हा घाणेरड्या कापडाने झाकले. एकच सांगतो, तो कपडा आम्ही पुन्हा काढून फेकू. महाराजांच्या दर्शनाचा हक्क प्रत्येकाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. त्यांचा अपमान आम्ही एका क्षणासाठीही सहन करणार नाही. जे काही सहन करावे लागेल, ते आनंदाने करू, असं अमित ठाकरे यांनी म्हटले आहे.


