नाशिक : इंदिरानगर परिसरात राहणाऱ्या एका महिलेला तंत्र-मंत्राच्या नावावर गंडा घालून तब्बल १४ वर्षे सतत बलात्कार करणाऱ्या आणि एकूण ५० लाख रुपयांना गंडा घालणाऱ्या भोंदू बाबाविरोधात इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गणेश जगताप असे या भोंदू बाबाचे नाव असून तो सध्या फरार आहे.
“शरीरसंबंध ठेव नाहीतर घरातील एकाचा बळी जाईल”
पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, गणेश जगताप याने महिलेला “तू मला आवडतेस, तुला मिळवण्यासाठी मी स्मशानात पूजा करतो” असे सांगून प्रथम प्रेमाचे आमिष दाखवले. नंतर त्याने एक पुस्तक तयार केले, ज्यात महिलेच्या पतीचे आणि मुलांचे नाव लिहिले होते. “तू माझ्यासोबत शरीरसंबंध ठेवले नाहीस तर या पुस्तकातील एकाचा मृत्यू होईल,” अशी धमकी देऊन त्याने महिलेवर दबाव टाकला. याच धमकीच्या बळावर २०१० पासून आतापर्यंत वारंवार तिच्यावर बलात्कार केला.
अनेक खोटी आश्वासने देऊन भोंदू बाबाने महिलेकडून व तिच्या कुटुंबीयांकडून सुमारे ५० लाख रुपये उकळले. गणेश जगताप याच्या विरोधात यापूर्वीही फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत आणि त्याला अटकही झाली होती. तरीही तो पुन्हा सक्रिय झाला आणि आता बलात्काराचा एवढा गंभीर गुन्हा उघडकीस आला आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या भोंदू बाबाला तात्काळ अटक करून कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे. सध्या इंदिरानगर पोलीस त्याच्या शोधात आहेत. पोलिस कधी आणि कशी कारवाई करतात, याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.


