पुणे : शहरातील वाढती वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेने खासगी लक्झरी बसेस आणि ट्रॅव्हल्ससाठी नवे नियम लागू केले आहेत. यात बाहेरून येणाऱ्या आणि पुण्यातून बाहेर पडणाऱ्या बसेसच्या मार्ग, वेळा आणि थांब्यांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत.
पुणे वाहतूक शाखेच्या पोलिस उपायुक्त (ट्रॅफिक) कार्यालयात लक्झरी ट्रॅव्हल्स आणि खासगी बसेस असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या नियमांमुळे शहरातील रस्त्यांवर होणारा अडथळा कमी होईल आणि नागरिकांना सोय होईल, असे वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे.
नव्या नियमांची मुख्य वैशिष्ट्ये
- खासगी बसेसला पुणे शहरात फक्त सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत ठराविक मार्गांवरच प्रवेश मिळेल. इतर वेळी किंवा मार्गांवर प्रवेश पूर्णपणे बंद.
- कोणत्याही बस थांब्यावर बस ३ मिनिटांपेक्षा जास्त थांबू शकणार नाही. एकाच ठिकाणी ३-४ बसेस उभ्या राहिल्यास वाहतूक कोंडी वाढते, ही समस्या सोडवण्यासाठी हा नियम.
- नियम तात्काळ लागू झाले असून, १५ दिवसांत हरकत किंवा सूचना नोंदवता येतील. उल्लंघन झाल्यास दंड आकारला जाईल.
या बदलांचा उद्देश वाहनचालकांची गैरसोय टाळणे आणि शहरातील वाहतुकीला गती देणे हा आहे.
पुण्यातून सुटणाऱ्या खासगी बसेसचे मार्ग –
१. स्वारगेट येथील मित्रमंडळ चौक व पद्मावती पार्किंग येथून सातारा रस्ता मार्गे जाणाऱ्या बस व्होल्गा चौक- मार्केट यार्ड चौक, सातारा रस्ता, पद्मावती, कात्रज चौक, नवले पूल आणि नवीन कात्रज बोगदा या मार्गाने जातील
बस थांबा – मित्रमंडळ चौक आणि कात्रज सर्पोद्यान.
२. स्वारगेट येथील मित्रमंडळ चौक व पद्मावती पार्किंग येथून सोलापूर रस्ता मार्गे जाणाऱ्या बस व्होल्गा चौक- मार्केट यार्ड, सातारा रस्ता, गंगाधाम चौक, वानवडी बाजार चौकी, सोलापूर रस्ता, हडपसर मार्गे जातील.
बस थांबा – भैरोबानाला आणि शेवाळवाडी
३. स्वारगेट येथील मित्रमंडळ चौक व पद्मावती पार्किंग येथून मुंबईकडे जाणाऱ्या बस दांडेकर पूल, सेनादत्त पोलिस चौकी, म्हात्रे पूल, पौड रस्ता, चांदणी चौकमार्गे जातील.
बस थांबा- या मार्गावर कुठेही बस थांबा नाही.
४. संगमवाडी पार्किंग येथून अहिल्यानगरकडे जाणाऱ्या बस संगमवाडी, आंबेडकर चौक, गोल्फ चौक, वाघोली या मार्गाने जातील.
बस थांबा – खराडी बायपास आणि वाघेश्वर पार्किंग
५. संगमवाडी पार्किंग येथून नाशिककडे जाणाऱ्या बस संगमवाडी – सादलबाबा चौक- चंद्रमा चौक, मुळा रोड, पोल्ट्री फार्म चौक, हॅरिस ब्रीज, नाशिक फाटा, नाशिक रोड या मार्गाने जातील.
बस थांबा – या मार्गावर कुठेही बस थांबा नाही.
६. संगमवाडी पार्किंग येथून मुंबईकडे जाणाऱ्या बस संगमवाडी- सादलबाबा चौक, चंद्रमा चौक, मुळा रोडा, पोल्ट्री फार्म चौक, हॅरिस ब्रीज, नाशिक फाटा, जुना मुंबई-पुणे हायवे, निगडी मार्गाने जातील.
बस थांबा – या मार्गावर कुठेही बस थांबा नाही.
७. वारजे जंक्शनवरूनअहील्यानगरकडे जाणाऱ्या बस आंबेडकर चौक कर्वे रोड पौड फाटा एस एन डी -टी- लॉ कॉलेज एस बी रोड पुणे विद्यापीठ चौक -संचेती इंजिनिअरींग कॉलेज संगमवाडी पार्किंग सादलबाबा चौक आंबेडकर चौक गोल्फ चौक शास्त्रीनगर चौक नगर रोड वाघोली मार्गे जातील.
बस थांबा – सगंमवाडी पार्किंग
पुणे शहरातून न सुटणाऱ्या पण बाहेरील शहरातून येणाऱ्या आणि जाणाऱ्या बसेससाठी थांबा –
१. मुंबई ते अहील्यानगर रोडमार्गे जाणाऱ्या बस हॅरिस ब्रिज जुना मुंबई पुणे हायवे पोल्ट्री फार्म चौक नगर रोड चौक मुळा रोडने चंद्रमा आंळदी रोड जंक्शन -आंबेडकर चौक गोल्फ कल्ब चौक शास्त्रीनगर वाघोली मार्गे जातील.
बस थांबा – संगमवाडी, खराडी बायपास, वाघेश्वर पार्किंग
२. मुंबई ते सोलापुर रोडमार्गे जाणाऱ्या बस जुना मुंबई पुणे हायवे हॅरिस ब्रीज पोल्ट्री फार्म चौक चंद्रमा आंळदी रोड जंक्शन चौक गोल्फ कल्ब चौक आंबेडकर शास्त्रीनगर चौक नगर रोड खराडी बायपास मुंढवा मगरपट्टा हडपसर मार्गे – सोलापुर रोड मार्गे जातील.
बस थांबा- संगमवाडी, खराडी बायपास, शेवाळवाडी
३. मुंबई ते सातारा रोड मार्गे जाणाऱ्या बस पुणे शहरामधून प्रवेश नाही (नो एन्ट्री) परंतू पुणे बंगलोर बायपास मार्गे बाणेर चांदणी चौक वारजे –वडगाव ब्रिज नवले ब्रिज नवीन कात्रज बोगद्यातून साताराकडे जातील.
बस थांबा – या मार्गावर कुठेही बस थांबा नाही.


