जुन्नर : पुणे जिल्ह्यातून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. शेततळ्यात बुडून दोन सख्या भावंडांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. खेळायला घराबाहेर पडलेली सखी बहीण आणि भाऊ परतलेच नाहीत.
शनिवारी (ता. २२) दुपारी चार वाजल्यापासून बेपत्ता झालेल्या आफान अफसर इनामदार (वय १०) आणि रिफत अफसर इनामदार (वय ७, दोघे रा. इस्लामपुरा, खडकवस्ती, जुन्नर) यांचा शोध घेत असताना रात्री साडेनऊ वाजता इदगाह मैदानालगतच्या शेततळ्यात दोघांचे मृतदेह आढळून आले.
शनिवारी दुपारी चार वाजल्यानंतर ही दोन्ही मुले घराबाहेर गेली होती. परंतु बराच वेळ झाला तरी ती परतली नाहीत, हे त्यांच्या आईच्या लक्षात आल्यानंतर तिने तात्काळ जुन्नर पोलिसांना कळवले. मुलांचे खेळण्याचे नेहमीचे ठिकाणेही तपासली गेली, पण तेथेही त्यांचा मागमूस मिळाला नाही.
विशेष म्हणजे, या भागात बिबट्याचा वावर असल्याने पोलिसांसह वनविभागाचे पथकही शोधमोहीमेसाठी तैनात करण्यात आले. ड्रोनच्या साहाय्याने शोधमोहीम राबवताना शेततळ्याच्या काठावर मुलांचे चप्पल-बूट आढळल्याने संशय बळावला. तलावात शोध घेतला असता दोघांचे मृतदेह पाण्यात तरंगताना दिसले. या घटनेने संपूर्ण परिसर हळहळला असून, पुढील तपास जुन्नर पोलिस करीत आहेत.


