बारामती : बारामती नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या उमेदवारांवर दबाव टाकण्यात येत आहे, मोठ्या प्रमाणात आर्थिक प्रलोभने देऊन फोडले जात असल्याचा गंभीर आरोप पक्षाचे नेते युगेंद्र पवार यांनी केला आहे. जे लोकसभेला झालं, विधानसभेला झालं तेच आता नगरपालिका निवडणुकीतही होत आहे असंही युगेंद्र पवार म्हणाले.
राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या प्रचाराच्या शुभारंभप्रसंगी बोलताना युगेंद्र पवार म्हणाले, “अजित पवार गटाचे आठ उमेदवार बिनविरोध निवडून आले. त्यापैकी चार जागांवर आमचे उमेदवार होते. त्या चार उमेदवारांना प्रत्येकी २० लाख रुपये देऊन फोडण्यात आल्याची चर्चा परिसरात आहे. आमचे उमेदवार सर्वसामान्य कुटुंबातील, कष्टकरी आहेत. दहा वर्षे मेहनत केली तरी त्यांना २० लाख रुपये जमत नाहीत. त्यापैकी दोन उमेदवार तर नुकतेच आमच्याकडे आलेले होते आणि कुठल्याही पक्षात नव्हते. असं युगेंद्र पवार म्हणाले.
पुढे म्हणाले, आमच्या उमेदवारांवर प्रचंड दबाव टाकला जात आहे. आमच्यासमोर खूप मोठी शक्ती आहे, सत्ता आहे, पैसा आहे, संस्था आहेत. लोकसभेला जे झाले, विधानसभेला जे झाले, तेच आता नगरपालिका निवडणुकीत घडत आहे. ही दहशत थांबलेली नाही, असंही युगेंद्र पवार यावेळी म्हणाले.
या वेळेला तुम्ही सामान्य घरातील लोकांना एखदा संधी देऊन बघा. लोकशाही जिवंत ठेवायची असेल आणि मजबूत विरोधी पक्ष हवा असेल तर यावेळी सर्वसामान्य उमेदवारांना संधी द्या, असे आवाहनही युगेंद्र पवार यांनी मतदारांना केले.


