नवी दिल्ली : भारताच्या न्यायव्यवस्थेत आज एक महत्त्वपूर्ण बदल झाला. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी देशाचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार स्वीकारला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात त्यांना शपथ दिली. अलीकडे निवृत्त झालेल्या सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्या जागी आता न्यायमूर्ती सूर्यकांत सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख म्हणून काम पाहणार आहेत.
कार्यकाळ किती?
नव्या सरन्यायाधीशांचा कार्यकाळ २४ नोव्हेंबर २०२५ पासून ९ फेब्रुवारी २०२७ पर्यंत असेल. या नियुक्तीबाबतची अधिसूचना केंद्रीय कायदा मंत्रालयाने काही दिवसांपूर्वीच जारी केली होती.
हरियाणातून सर्वोच्च न्यायालयापर्यंतचा प्रवास
दरम्यान, १० फेब्रुवारी १९६२ रोजी हरियाणातील हिसार येथे मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या सूर्यकांत यांनी आपल्या न्यायिक कारकिर्दीत अनेक ऐतिहासिक निकाल दिले. पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयातील उल्लेखनीय कामगिरीनंतर २०१८ मध्ये त्यांची हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर ते सर्वोच्च न्यायालयात रुजू झाले आणि आता देशाच्या न्यायव्यवस्थेचे सर्वोच्च पद त्यांच्या हाती आले आहे.
न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्याकडील संपत्ती
- न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नावावर एकही चारचाकी वाहन नाही, मात्र त्यांच्या पत्नींच्या मालकीची वॅगनआर कार आहे.
- देशभरात त्यांच्याकडे सहा निवासी मालमत्ता आणि दोन भूखंड आहेत.
- न्यू चंदीगड (इको सिटी-२) येथे ५०० चौरस यार्डचा भूखंड
- चंदीगड सेक्टर-१८सी मध्ये १९२ चौरस यार्डचे घर
- पंचकुला (गोलपुरा गाव) येथे १३.५ एकर शेती जमीन
- गुरुग्रामच्या सुशांत लोक-१ मध्ये ३०० चौरस यार्डचा भूखंड
- डीएलएफ-२ मध्ये २५० चौरस यार्डचे घर
- दिल्लीतील ग्रेटर कैलाश-१ येथे २८५ चौरस यार्डच्या मालमत्तेतील तळमजला आणि तळघर.
याशिवाय, त्यांच्या मूळ गावी हिसारजवळ पेटरवारमध्ये १२ एकर शेती जमीन आहे. तसेच पेटरवार आणि हिसार अर्बन इस्टेट-२ येथील वडिलोपार्जित संपत्तीमध्ये त्यांचा एक-तृतीयांश हिस्सा आहे.


