Dharmendra Passes Away: बॉलिवूडच्या सुवर्णयुगातील दमदार अभिनेता आणि चाहत्यांच्या हृदयात खास स्थान निर्माण करणारे धर्मेंद्र यांचे आज निधन झाले आहे. ८९ वर्षांचे धर्मेंद्र गेल्या काही आठवड्यांपासून प्रकृती समस्यांशी झुंज देत होते आणि मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. डॉक्टरांनी अनेक दिवस शर्थीचे प्रयत्न केले, मात्र अखेर आज त्यांनी शेवटचा श्वास घेतला. या दुःखद बातमीनंतर बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे.
वाढदिवसापूर्वीच काळाने हिरावला हिरा
धर्मेंद्र यांना रुग्णालयातून १२ नोव्हेंबर रोजी डिस्चार्ज देण्यात आला होता आणि त्यांच्या घरी अगदी साध्या वातावरणात देखरेख सुरू होती. कुटुंबीय ८ डिसेंबरला होणाऱ्या त्यांच्या ९० व्या वाढदिवसाची तयारी करत होते. मात्र नियतीने त्यांना त्याआधीच हिरावून घेतलं.
खोट्या बातमीने कुटुंबीय संतप्त
काही दिवसांपूर्वी धर्मेंद्र यांच्या प्रकृतीविषयी अफवा पसरवल्या गेल्या होत्या. त्यांच्या निधनाची खोटी बातमी व्हायरल झाल्यावर पत्नी हेमा मालिनी, मुलगी ईशा देओल आणि मुलगा सनी देओल यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
६५ वर्षांची कारकीर्द, ३०० पेक्षा अधिक चित्रपटांचा ठसा
धर्मेंद्र हे केवळ रोमँटिक हिरो नव्हते, तर अॅक्शन, ड्रामा आणि विनोद अशा सर्वच प्रकारात ते पारंगत होते. त्यांनी ३०० हून अधिक चित्रपटांत काम केलं. त्यांनी “शोले”, “सीता और गीता”, “चुपके चुपके”, “धरम वीर”, “अनुपमा” यांसारख्या चित्रपटात अविस्मरणीय भूमिका केली. धर्मेंद्र यांच्या निधनाने बॉलिवूडचे एक अढळ स्तंभ कोसळला आहे. लाखो चाहत्यांसाठी आणि कला-सृष्टीसाठी ही अपूरणीय हानी आहे. त्यांच्या अभिनयाचा वारसा पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील.


