Gauri Palve Suicide: राज्याच्या पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहायक अनंत गर्जे यांच्या पत्नी आणि केईएम रुग्णालयातील डॉक्टर गौरी पालवे गर्जे यांनी शनिवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुरुवातीला कौटुंबिक मानसिक त्रासामुळे त्यांनी टोकाचा निर्णय घेतल्याची चर्चा होती. मात्र, गौरी पालवे यांचे नातेवाईकांनी ही आत्महत्या नसून सुनियोजित हत्या असल्याचा गंभीर आरोप केला होता.
पालवे कुटुंबाचा संताप उसळला
सोमवारी अहिल्यानगर तालुक्यातील मोहोज देवढे येथे गौरी पालवे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, या वेळी परिस्थिती चिघळली. पालवे कुटुंबीयांनी अनंत गर्जे यांच्या घरासमोरच अंत्यसंस्कार करण्याचा आग्रह धरला, ज्यामुळे दोन्ही बाजूंमध्ये वाद निर्माण झाला. पोलिसांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि शेवटी गर्जे यांच्या घराशेजारीच अंतिम संस्कार पार पडले.
हेही वाचा – Gauri Death Case : गौरी आत्महत्याप्रकरणी पंकजा मुंडेंचा पीए अनंत गर्जेला अटक; मध्यरात्री पोलिसांनी फास आवळला
अंत्यसंस्कारादरम्यान गौरींच्या वडिलांनी हंबरडा फोडला. त्यांनी उपस्थीत पोलिस अधिकाऱ्यांना विनंती करत म्हटले, “तुम्हालाही मुली असतील… आमच्या मुलीला न्याय द्या. तुमच्या मुली गरीबाला द्या, श्रीमंतांच्या नादी लागू नका. श्रीमंतीच्या भपक्यावर जाऊ नका.” या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे.
अनंत गर्जे अटकेत
गौरींच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर रविवारी मध्यरात्री वरळी पोलिसांनी अनंत गर्जे यांना ताब्यात घेतले. याच प्रकरणात त्यांच्या भावावर आणि बहिणीवर देखील आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सुरुवातीला अटकेबाबत पालवे कुटुंबाला माहिती नसल्याने त्यांनी अंत्यसंस्कारास विरोध केला होता. नंतर पोलिसांनी अनंत गर्जे अटकेत असल्याची माहिती दिल्यानंतर ते अत्यंसंस्काराला तयार झाले.
आज गर्जे यांना न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता असून, त्यांची पोलीस कोठडीची मागणी होऊ शकते. दरम्यान, पोलिसांचे एक पथक डॉक्टर आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांसह वरळीतील गर्जे यांच्या घराची झाडाझडती घेण्यासाठी रवाना झाले आहे. या तपासात महत्त्वाचे पुरावे सापडतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गावात कडेकोट बंदोबस्त
घटनेनंतर मोहोज देवढे गावात तणावाचे वातावरण असून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. परिस्थिती सध्या नियंत्रणात असली तरी गावातील नागरिकांमध्ये अस्वस्थता कायम आहे.


