Monsoon Update : राज्यातील नागरिक आणि शेतकरी मान्सूनच्या प्रतीक्षेत असतानाच हवामान विभागाने महत्त्वाची माहिती दिली आहे. अनुकूल वातावरणाचा अभाव आणि कोरड्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे मान्सूनची प्रगती सध्या मंदावली असून मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून पोहोचण्यासाठी आणखी काही दिवस लागण्याची शक्यता आहे.
यापूर्वी हवामान विभागाने १५ ते १६ जूनदरम्यान मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल, असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र वातावरणातील बदल आणि कोरड्या वाऱ्यांमुळे ही प्रक्रिया अपेक्षेपेक्षा संथ झाली आहे. आता नव्या अंदाजानुसार २० जूनपर्यंत मान्सून मुंबईसह राज्याच्या बहुतांश भागात सक्रिय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान तज्ज्ञांच्या मते, प्रशांत महासागरातील एल निनोचा परिणाम यंदाच्या मान्सूनवर होत असून त्यामुळे पावसाच्या आगमनात विलंब होत आहे. मान्सूनची वाटचाल पुन्हा वेग घेण्यासाठी वातावरण अनुकूल होणे आवश्यक असल्याचेही सांगितले जात आहे.
दरम्यान, हवामान विभागाने यंदा राज्यात सरासरीच्या सुमारे ९० टक्के पाऊस पडण्याचा अंदाज कायम ठेवला आहे. कृषी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना घाईघाईने पेरणी न करण्याचा सल्ला देत सातत्यपूर्ण पावसाची सुरुवात झाल्यानंतरच खरीप हंगामातील कामे सुरू करण्याचे आवाहन केले आहे.
देशाच्या पूर्वेकडील भागात मात्र मान्सूनची प्रगती सुरू असून पश्चिम बंगाल, बिहार, ओडिशा आणि झारखंडच्या काही भागांत नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी पुढे वाटचाल केली आहे. महाराष्ट्रातही येत्या काही दिवसांत मान्सूनला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून २० जूनपर्यंत राज्यभर पावसाची परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे.


