Pandharpur Vitthal Temple: आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या लाखो वारकरी आणि भाविकांसाठी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर प्रशासनाने एक अत्यंत महत्त्वाची सूचना जारी केली आहे. येत्या २२ जून, २३ जून आणि २४ जून रोजी विठ्ठलाचे मंदिर सर्व प्रकारच्या दर्शनासाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. श्री विठ्ठलाच्या मूर्तीची होणारी नैसर्गिक झीज थांबवण्यासाठी आणि तिच्या संवर्धनासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. या तीन दिवसांच्या कालावधीत भाविकांनी पंढरपूरला येणे टाळावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे अधिकृत आवाहन करण्यात आले आहे.
विठ्ठल मूर्तीच्या पायाला पडलेला खड्डा आणि इतर भागांतील झीज लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली मंदिर समिती, वारकरी संप्रदाय आणि पुरातत्व विभागाची एक तातडीची बैठक पार पडली. या बैठकीत मूर्तीवर रासायनिक पद्धतीने लेपन करण्याचा निर्णय अंतिम करण्यात आला. त्यानुसार, मूळ दगडाची पूड सेंद्रिय रसायनात (epoxy resin) मिसळून झिजलेले भाग दुरुस्त केले जातील, ज्यामुळे मूर्तीला एक सुरक्षित कवच मिळून तिचे आयुष्य वाढण्यास मदत होईल.
पुरातत्व विभागाच्या तज्ज्ञ चमूच्या देखरेखीखाली होणार काम
मूर्ती संवर्धनाची ही अत्यंत संवेदनशील आणि तांत्रिक प्रक्रिया ‘भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण’ (ASI) छत्रपती संभाजीनगर, राज्य पुरातत्त्व विभाग पुणे आणि इतर तज्ज्ञांच्या थेट मार्गदर्शनाखाली पूर्ण केली जाईल. २२ ते २४ जून या तीन दिवसांच्या नियोजित आराखड्यात, प्रत्यक्ष कामाची अचूकता आणि मूर्तीचे पावित्र्य राखण्यासाठी २३ व २४ जून रोजी गाभारा आणि मंदिर भाविकांसाठी पूर्णपणे बंद असेल.
पाच वर्षांनंतर पुन्हा संवर्धन
दरम्यान, विठ्ठल मूर्तीवर अशा प्रकारचे संरक्षण लेपन करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी १९८८, २००५, २०१२ आणि २०२० मध्येही मूर्तीचे यशस्वी संवर्धन करण्यात आले होते. शेवटच्या प्रक्रियेला आता सुमारे ५ वर्षे पूर्ण झाल्याने मूर्तीवर नैसर्गिक सूक्ष्म छिद्रे निर्माण झाली होती. आगामी आषाढी वारीतील गर्दी आणि मूर्तीचे दीर्घकालीन जतन लक्षात घेता, पुरातत्व विभागाच्या नियमावलीनुसार हे काम करणे अत्यंत गरजेचे बनले होते.


