अमरावती (वरुड) : लग्न हा आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण मानला जातो, पण अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील पुसला गावात बुधवार, २६ नोव्हेंबरला हा आनंद काही मिनिटांतच शोकांतिका बनला. लग्नविधी पूर्ण होऊन अवघ्या अर्ध्या तासातच नवरदेव अमोल गोड (वय ३०) यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि ते लग्नमांडवातच कोसळले. रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
पुसला येथील तलाठी कार्यालयात कोतवाल म्हणून कार्यरत असलेले अमोल गोड यांचा विवाह दुपारी शुभ मुहूर्तावर पार पडला. वधू-वराला आशीर्वाद देण्यासाठी नातेवाईक आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. “शुभ मंगल सावधान”च्या घोषणेनंतर सर्वांनी टाळ्या वाजवून जोडप्याला शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र, लग्न संपल्यावर फोटो काढताना आणि पाहुण्यांचे स्वागत करताना अचानक अमोल यांना छातीत दुखू लागले आणि ते जागीच खाली कोसळले.
घटनेनंतर लग्नमांडवात एकच गोंधळ उडाला. पाहुणे-नातेवाईकांनी तात्काळ अमोल यांना वरुड येथील खाजगी रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी तपासणी करताच त्यांना मृत घोषित केले. हृदयविकाराचा जबरदस्त झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
अमोल हे पुसला गावातील साधे-भोळे आणि मेहनती तरुण म्हणून परिसरात परिचित होते. अवघ्या ३० व्या वर्षी त्यांचे अकाली निधन झाल्याने नवरीसह दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. काही तासांपूर्वी आनंदाने गजबजलेला लग्नमांडव आता शोकाकुल झाला असून, आनंदोत्सवाऐवजी अंत्ययात्रेची तयारी सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून “नशिबाचा खेळ निराळाच” अशा प्रतिक्रिया येत आहेत.


