IMD Alert : महाराष्ट्रात ८ जूनपासून रखडलेला मान्सून पुढील आठवड्यात पुन्हा वेग धरण्याची शक्यता असून, मंगळवारपासून (ता. २३) मान्सूनच्या पुढील प्रवासासाठी पोषक हवामान तयार होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. १ जुलैपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल, अशी शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
दरम्यान, पुढील चार दिवस राज्यातील बहुतांश भागांत पावसाची शक्यता कमी राहणार आहे. कोकण वगळता इतर भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
आज राज्यातील काही भागांमध्ये उष्ण व दमट हवामानाचा त्रास जाणवणार असून, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उर्वरित राज्यात ढगाळ वातावरणासह कडक उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज आहे.
मान्सूनने सध्या आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिशा, पश्चिम बंगाल, बिहार आणि झारखंडच्या बहुतांश भागांमध्ये प्रगती केली असून, आगामी काही दिवसांत महाराष्ट्रासह छत्तीसगडच्या काही भागांतही त्याचे आगमन होण्याची शक्यता आहे.
उष्ण व दमट हवामानाचा यलो अलर्ट असलेले जिल्हे
पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, नाशिक, अहिल्यानगर, अकोला, वर्धा आणि चंद्रपूर.
वादळी पावसाचा यलो अलर्ट असलेले जिल्हे
यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली.
दरम्यान, राज्यातील काही भागांत तापमानाचा पारा अद्यापही चाळिशीपार असून ब्रह्मपुरी येथे ४२.३ अंश सेल्सिअस, तर मालेगाव, अकोला आणि वर्धा येथे ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.


