Pune Crime : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील रांजणगाव औद्योगिक वसाहतीत एका ३ वर्षीय चिमुकल्याच्या हत्येची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मुलाच्या आईसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या २० वर्षीय तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुलाला त्याच्या वडिलांकडे सोडण्याच्या मुद्द्यावरून आरोपी आणि मुलाच्या आईमध्ये काही दिवसांपासून वाद सुरू होते. घटनेच्या दिवशी दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. त्यानंतर महिला कामावर निघून गेली असता घरात मुलगा आणि आरोपी एकटे होते.
याच दरम्यान आरोपीने चिमुकल्याची हत्या केल्याचा आरोप आहे. संध्याकाळी आरोपीने महिलेला फोन करून “तुझा मुलगा आता राहिला नाही” अशी माहिती दिली. हा फोन मिळताच महिला तातडीने घरी पोहोचली. घराचा दरवाजा उघडा असल्याचे तिच्या निदर्शनास आले. घरात प्रवेश करताच तिला मुलगा मृतावस्थेत आढळला.
मुलाच्या चेहऱ्यावर आणि तोंडावर जखमांच्या खुणा दिसून आल्याने महिलेने तत्काळ रांजणगाव पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.
रांजणगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक कुमार कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेनंतर आरोपीचा शोध घेण्यात आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून प्राथमिक चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून हत्येमागील नेमके कारण शोधण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.


