पुणे: पुणे महापालिकेच्या मालमत्ता कर अभय योजनेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. यापूर्वी 2015-16, 2016-17, 202-21 आणि 2021-22 मध्ये अभय योजनेचा लाभ घेतलेल्या मिळकतधारकांना या वेळी वगळण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता हा नियम शिथिल करत त्या १ लाख ४० हजार ४३७ मिळकतधारकांनाही योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्थायी समितीच्या आजच्या बैठकीत याला मान्यता देण्यात आली.
अभय योजना 2025-26 ही योजना 15 नोव्हेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 या कालावधीत राबवली जाणार आहे. यात थकीत मालमत्ता करावरील 2% चक्रवाढ व्याजाच्या रकमेवर तब्बल 75 टक्के सूट दिली जाणार आहे. मागील योजनांचा लाभ घेतलेल्या मिळकतधारकांनाही आता हा लाभ 1 डिसेंबरपासून मिळणार असल्याने त्यांच्याकडील सुमारे 935 कोटींची थकबाकी वसूल होण्यास मोठी मदत होणार आहे.
महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी सुरुवातीला मागील लाभार्थींना वगळण्याचा निर्णय जाहीर केला होता. पण करवसुलीचा वेग वाढावा आणि जास्तीत जास्त नागरिकांना दिलासा मिळावा या उद्देशाने हा नियम बदलला गेला. आता शहर आणि समाविष्ट गावांतील सर्वच थकबाकीदारांना या योजनेचा लाभ घेता येईल.
या निर्णयामुळे पुणे महापालिकेला एकाच वेळी करदात्यांना मोठा दिलासा देण्याबरोबरच कोट्यवधींची थकबाकी वसूल करण्याची संधी मिळणार आहे. मिळकतधारकांनी 15 जानेवारीपूर्वी आपली थकबाकी भरून अभय योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.


