सांगली : जत नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराचा आज (१ डिसेंबर) शेवटचा दिवस असताना प्रचाराला हिंसक वळण लागलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुरेश शिंदे यांच्या घरावर आणि त्यांच्या गाडीवर सोमवारी पहाटे अज्ञात व्यक्तींनी जोरदार दगडफेक केली.
या घटनेत गाडीच्या काचा फुटल्या, घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. सुदैवाने कुणाला दुखापत झाली नाही. सुरेश शिंदे यांनी तात्काळ जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत आहेत.
भाजपवर गंभीर आरोप
अजित पवार गटाचे नेते आणि माजी आमदार विलासराव जगताप यांनी या हल्ल्यामागे भाजप असल्याचा थेट आरोप केला. त्यांनी म्हटलं, “भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला आहे. आमचे उमेदवार पुढे जात असल्याचं पाहून त्यांना धडकी भरली आहे.” दरम्यान, भाजपकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
आज रात्री १० वाजता प्रचार थांबणार
नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी जाहीर प्रचार आज रात्री ठीक १० वाजता संपुष्टात येईल. त्यानंतर कोणत्याही प्रकारच्या जाहिराती, सभा किंवा प्रचाराला परवानगी नाही. उद्या म्हणजेच २ डिसेंबर रोजी मतदान होणार असून ३ डिसेंबर निकाल जाहीर होणार आहे.
जतसह राज्यातील अनेक नगरपरिषद-नगरपंचायतींच्या निवडणुकीत पैशांचा आणि सत्तेचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याच्या तक्रारी येत असतानाच आता हिंसक घटनांनी निवडणुकीचं वातावरण अधिक तणावपूर्ण केलं आहे.


