Cyber Crime In Pune: ऑनलाइन माध्यमातून आयुष्याचा साथीदार शोधण्याचा प्रयत्न पुण्यातील एका तरुणीला चांगलाच महागात पडला आहे. लोकप्रिय मॅट्रिमोनिअल साईटवर नोंदणी केल्यानंतर तिच्याशी संपर्क साधणाऱ्या सायबर गुन्हेगाराने लग्नाचे आश्वासन देत तिची तब्बल सहा लाख रुपयांनी फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात समर्थ पोलिस ठाण्यात माहिती-तंत्रज्ञान कायदा व फसवणुकीसह गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रास्ता पेठ परिसरातील ही तरुणी विवाहासाठी संकेतस्थळावर सक्रिय होती. त्याचदरम्यान एका व्यक्तीने ‘जीवनसाथी’ होण्याचे आमिष दाखवत तिच्याशी संवाद सुरू केला. काही दिवसांमध्येच विश्वास संपादन करून त्याने प्रेमसंबंधाचा बहाणा करत तिचा विश्वास पूर्णपणे मिळवला. विश्वासाचा गैरफायदा घेत संशयिताने अचानक विविध भावनिक प्रसंग, आर्थिक अडचणी किंवा तातडीच्या कारणांचा हवाला देत पैशांची मागणी सुरू केली. त्याच्यावर विश्वास ठेवून तरुणीने अनेक वेळा त्याच्या खात्यात एकूण सहा लाख रुपये वर्ग केले. पैसे मिळाल्यानंतर मात्र त्या व्यक्तीने संवाद टाळण्यास सुरुवात केली आणि अखेरीस आपला मोबाईल बंद केला.
हेही वाचा – पुणे हादरलं आधी मैत्रिणीची हत्या अन् मग तरुणाचं खळबळजनक पाऊल, धक्कादायक घटना
फसवणुकीचे वास्तव समोर आल्यानंतर तरुणीने पोलिसांकडे धाव घेत तक्रार नोंदवली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक चेतन मोरे या संपूर्ण घटनेचा पुढील तपास करत आहेत. मॅट्रिमोनिअल प्लॅटफॉर्मवरून अशा प्रकारे नागरिकांची फसवणूक होण्याच्या घटना यापूर्वीही अनेकदा समोर आल्या आहेत. त्यामुळे अनोळखी व्यक्तींवर लगेच विश्वास न ठेवण्याचे, तसेच प्रोफाइलची खातरजमा केल्याशिवाय कोणताही निर्णय न घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, ऑनलाइन ओळखीतून आर्थिक मदत मागितल्यास कोणत्याही परिस्थितीत ती देऊ नये, असा इशाराही पोलिसंनी दिला आहे.


