मालवण : मालवण नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराची सांगता झाल्यानंतर मध्यरात्री पोलिसांच्या नाकाबंदीत देवगड येथील भाजप नेत्यांच्या कारमधून सुमारे दीड लाख रुपयांची रोख रक्कम व काही पाकिटे जप्त झाली. ही बाब समजताच शिवसेना नेते तथा आमदार नितेश राणे यांनी मालवण पोलिस ठाण्यात धाव घेऊन तात्काळ गुन्हा दाखल करण्याची आग्रही मागणी केली.
निवडणूक पथक व स्थानिक पोलिसांनी पिंपळपार येथे वाहनतपासणी केली असता ही कार अडवली गेली. कारमध्ये देवगड भाजप तालुकाध्यक्ष महेश नारकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष बाबा परब, अजिंक्य पाताडे आदी उपस्थित होते. पोलिसांनी कार ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. याचवेळी मालवणचे दोन भाजप पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि कार सोडण्याबाबत पोलिसांशी चर्चा करू लागले.
शिवसेना पदाधिकाऱ्यांनी ही माहिती आमदार नितेश राणे यांना दिल्यानंतर राणे रात्री १२ वाजता थेट पोलिस ठाण्यात पोहोचले. “जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही,” अशी ठाम भूमिका त्यांनी घेत ठाण्यातच ठिय्या मांडला. दोन तासांनंतर डिवायएसपी घटनास्थळी दाखल झाले. शेवटी पोलिसांनी मालवणमधील भाजपच्या तिघा पदाधिकाऱ्यांवर भादंवि कलम १७१ व ५० अंतर्गत गुन्हा दाखल केला. कारमधील रोख रक्कम जप्त करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.


