पुणे : पुण्यातील सतत वाढणाऱ्या वाहतूक कोंडीला आळा घालण्यासाठी आता थेट पोलीस आयुक्त अमितेश कुमार स्वतः रस्त्यावर उतरले आहेत. विमाननगर परिसरातून वारंवार येणाऱ्या तक्रारींची गंभीर दखल घेत आयुक्तांनी आज भल्यापहाटे सहाय्यक आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना घेऊन प्रत्यक्ष रस्त्यावर येऊन वाहतुकीचा आढावा घेतला.
या पाहणीअंती विमाननगर परिसरात तातडीने वाहतूक नियंत्रणासाठी मोठे बदल करण्यात आले असून काही महत्त्वाच्या रस्त्यांवर एकेरी वाहतूक* (One-Way) लागू करण्यात आली आहे. नवे नियम खालीलप्रमाणे :
एकेरी वाहतूक लागू असलेले मार्ग
श्रीकृष्ण हॉटेल चौक → दत्तमंदिर चौक → सीसीडी चौक – गंगापुरम चौक → कैलास सुपर मार्केट चौक → गणपती मंदिर चौक
दुतर्फा वाहतूक सुरू राहणारे मार्ग
– सीसीडी चौक → गंगापुरम चौक
– दत्तमंदिर चौक → कैलास सुपर मार्केट चौक
– गणपती मंदिर चौक → श्रीकृष्ण हॉटेल चौक
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी वारजे भागात वाहतूक पोलिसांना काळ्या काचा व ड्रायव्हिंग लायसन्सबाबत विचारणा केल्यावरून एका चारचाकी वाहनचालकाने उर्मटपणे वाद घातला होता. पोलिसांनी कडक भूमिका घेतल्यावर संबंधित तरुणाने हात जोडून माफी मागितली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
शहराचा झपाट्याने होणारा विस्तार आणि वाहनसंख्येतील वाढ लक्षात घेता पुणे पोलीस वाहतूक विभाग सतत नवे उपाय शोधत असून आयुक्तांच्या प्रत्यक्ष दखल व नव्या एकेरी मार्गांमुळे विमाननगरवासीयांना लवकरच कोंडीतून दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे.


