ठाणे : शिवसेना भवनातून बाहेर पडल्यानंतर एकनाथ शिंदेंनी ठाणे जिल्ह्यात, विशेषतः पूर्व कोपरी- पाचपाखाडी भागात आपला बालेकिल्ला मजबूत केला होता, असं चित्र होतं. मात्र मंगळवारी त्याच बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे गटाने मोठा सुरुंग लावला.
गेल्या 20-22 वर्षांपासून उपशाखाप्रमुख आणि सध्या उपविभागप्रमुख असलेले आबा मोरे यांच्यासह तब्बल 200 ते 300 जुनेजाणते शिवसैनिक मंगळवारी थेट मातोश्रीवर पोहोचले आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पुन्हा शिवबंधन बांधत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला.
आबा मोरे हे ठाण्यातील माजी सभागृह नेते पांडुरंग पाटील यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांच्या या निर्णयामुळे कोपरी-पाचपाखाडी भागातील राजकीय समीकरणे बदलली असून शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.
शिंदे गट सोडण्यामागचं कारण सांगताना आबा मोरे यांनी थेट आरोप केले की, “गेल्या 9 वर्षांत आम्ही आमच्या भागातील लोकांची अनेक कामे वरिष्ठ नेत्यांकडे घेऊन गेलो, पण एकही काम मार्गी लागलं नाही. जुन्या शिवसैनिकांना दुय्यम वागणूक मिळते, माजी नगरसेवक आणि पदाधिकारी मनमानी करतात. ही बाब वारंवार वरिष्ठांच्या कानावर घातली, पण कोणीही दखल घेतली नाही. त्यामुळेच आम्ही मातोश्रीकडे परतलो.”
या पक्षप्रवेश प्रसंगी माजी खासदार राजन विचारे, युवासेना नेते तथा कोपरी-पाचपाखाडी विधानसभा प्रमुख राजेश वायाळ आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, अलीकडेच भाजपाने शिंदे गटातील काही माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना पक्षात घेतल्याने शिंदे-भाजप यांच्यातील तणावाच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यातच आता उद्धव ठाकरे गटाने शिंदेंच्या भागात घुसखोरी करत मोठा मानसिक धक्का दिला आहे.


