मुंबई : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंत्रालयासमोरील राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात भेट घेतली. मात्र, या भेटीत हत्या प्रकरणावर अथवा मुंडे यांच्या राजीनाम्यावर चर्चा झाली नसल्याचे धस यांनी भेटीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले.
बीडमधील काही पतसंस्थांनी १६ लाख गुंतवणूकदारांचे नुकसान केले असून, त्याबाबत तक्रार करण्यासाठी आणि त्यावर मार्ग काढण्यासाठी पवार यांची भेट घेतल्याचे धस यांनी सांगितले. ज्ञानराधा मल्टिस्टेट को. ऑपरेटिव्ह युनियन, परळीतील एक बँक आणि राजस्थानी मल्टिस्टेट, जिजाऊ मल्टिस्टेट आणि इतर मल्टिस्टेट पंतसंस्थांमध्ये मराठवाड्यातील १६ लाख सभासद आहेत. एकट्या बीड जिल्ह्यातील सभासदांची संख्या सव्वा लाखाच्या घरात आहे.
१६ लाख सदस्यांचे पैसे पतसंस्थांनी बुडवले. त्यातून मार्ग काढला पाहिजे, केंद्र सरकारशी बोलले पाहिजे आणि एक बैठक घेतली पाहिजे या मागण्या घेऊन मी पवार यांना भेटलो, असे धस यांनी सांगितले. या प्रकरणात आतापर्यंत २६ जणांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे, याप्रकरणी तातडीने बैठक घ्यावी, अशी विनंतीही आपण केल्याचे त्यांनी सांगितले. या सर्व पतसंस्थांच्या घोटाळ्यात मंत्री धनंजय मुंडे यांचा काही सहभाग आहे का? असा प्रश्न धस यांना विचारला असता त्यांनी ‘नाही’ असे उत्तर दिले.


