कोल्हापूर : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी न्याय मागण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्र्यांकडे जाण्याची वेळ येते, यासारखे दुर्दैव नाही, अशी खंत व्यक्त करताना संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य सरकारवरही निशाणा साधला. जोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये इतके काय आहे की, ज्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काहीच भूमिका का घेत नाहीत ? मुंडे हे ओबीसी समाजाचे आहेत म्हणून सरकार शांत आहे काय, असा सवालही संभाजीराजे यांनी केला.
अजित पवार आणि धनंजय मुंडे यांची सोमवारी झालेली भेट हे नववर्षाचे निमित्त होते का ? जनतेला मूर्ख समजत आहेत काय, असा हल्लाबोलही त्यांनी केला. संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचा व्हिडीओ पोलिसांकडे असूनही ते जनतेसमीर का आणत नाहीत? राज्यातील जनतेला माहीत आहे की, संतोष देशमुख यांची हत्या कोणी केली; पण सरकार सपशेल दुर्लक्ष करत आहे, असा आरोपही संभाजीराजे यांनी केला.


