Thane Crime News : ठाणे कुटुंब न्यायालयाच्या आवारातच एका ३२ वर्षीय महिलेवर दोन पुरुषांनी कारमध्ये सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी महिलेला केकमध्ये गुंगीचे औषध देऊन तिला बेशुद्ध करून हे धक्कादायक कृत्य केले. मुख्य आरोपी हिरालाल केदार (वय ४२) याला ठाणे नगर पोलिसांनी अटक केली असून, दुसरा आरोपी रवी पवार (वय ३८) फरार आहे.
ही घटना २५ ऑगस्ट २०२५ रोजी घडली होती. मात्र आरोपींनी महिलेला वारंवार ब्लॅकमेल करत तक्रार दाखल करू नये अशी धमकी दिली. मात्र पीडितेने ५ डिसेंबरला ठाणे नगर पोलीस ठाण्यात धैर्याने तक्रार नोंदवली. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६(D) (सामूहिक अत्याचार), ३२८ (विष देऊन जखमी करणे), ५०६ (धमकी) तसेच आयटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला तिच्या वैवाहिक वादाच्या सुनावणीसाठी ठाणे फॅमिली कोर्टात आली होती. तिथे तिची ओळख असलेला हिरालाल केदार याने तिला भेटला. केदारने “तुझ्या केससाठी मदत करतो” असे सांगून महिलेला कोर्टाबाहेर आपल्या कारमध्ये बोलावले. तिथे त्याचा साथीदार रवी पवारही होता. दोघांनी महिलेला “जवळील कॅन्टिनमधून आणलेल्या केकमध्ये गुंगीचे औषध मिसळून तिला खाऊ घातले.
महिला बेशुद्ध झाल्यावर दोघांनी तिच्यावर कारमध्येच सामूहिक अत्याचार केला. यानंतर महिलेला धमकावून गप्प बसण्यास सांगितले. महिलेला सतत ब्लॅकमेल आणि धमक्या येत होत्या. अखेर ५ डिसेंबरला तिने ठाणे नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तातडीने हिरालाल केदार याला अटक केली तर रवी पवार हा अद्याप फरार आहे. पोलिसांनी महिलेची वैद्यकीय तपासणी केली असून फॉरेन्सिक अहवालाची वाट पाहत आहेत.
ठाण्याचे पोलीस उपायुक्त (झोन-१) डॉ. सुनील भारद्वाज यांनी सांगितले, ही अत्यंत गंभीर घटना आहे. फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार केली आहेत. २४ तासांत त्याला अटक करू, असं सांगितले.


