पुणे : गेल्या पाच दिवसांपासून इंडिगो एअरलाइन्सच्या मोठ्या प्रमाणातील उड्डाणे रद्द होण्यामुळे पुणे विमानतळावर प्रवाशांना प्रचंड हाल झाले आहेत. शुक्रवारी (५ डिसेंबर) एकट्या पुण्यात ४२ उड्डाणे रद्द झाली असून, शनिवारीही १४ आगमन आणि २८ प्रस्थान फ्लाइट्स रद्द झाल्या. या संकटामुळे इतर एअरलाइन्सनी तिकीट दर तिप्पट केले असून, हजारो प्रवासी अडकले आहेत.
केंद्रीय नागरी हवाई वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या प्रकरणात इंडिगोवर कडक भूमिका घेतली असून, “२-३ महिन्यांत करायच्या तांत्रिक तयारी केल्या नाहीत, त्यामुळे ही परिस्थिती उद्भवली. चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर कारवाई होईल,” असे म्हटले आहे. डीजीसीएने इंडिगो सीईओला शो-कॉज नोटीस जारी केली असून, ४ सदस्यीय समितीने तपास सुरू केला आहे.
मोहोळ यांनी शनिवारी एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत सांगितले की, “डीजीसीएने इंडिगोच्या मोठ्या प्रमाणातील विस्कळीत सेवेचे कारण जाणून घेण्यासाठी ४ सदस्यीय समिती नेमली आहे. ही समिती क्रू प्लॅनिंग, ऑपरेशनल तयारी आणि संशोधित FDTL (फ्लाइट ड्युटी टाईम लिमिट) नियमांचे पालन यांचा आढावा घेईल.” त्यांनी हायकोर्टाच्या आदेशानुसार पायलटांच्या ड्युटी तासांची अंमलबजावणी न करण्याबाबत इंडिगोची चूक असल्याचे नमूद केले. “अहमदाबाद दुर्घटनेनंतर पायलट असोसिएशनने ड्युटी तास १० तासांवरून ८ तासांवर आणण्याची मागणी केली होती. हायकोर्टाने आणि डीजीसीएने आदेश दिले, पण इंडिगोने वेळ पाळली नाही. देशातील ६५ टक्के विमानसेवा इंडिगोची असल्याने पायलट कमतरता आणि ड्युटी कपातीमुळे ही कोंडी निर्माण झाली,” असे मोहोळ म्हणाले.
इंडिगोच्या रद्द उड्डाणांमुळे पुण्यात प्रचंड गोंधळ
पुणे विमानतळावरून इंडिगोची ५७ सेवांपैकी शनिवारी फक्त ३७ सुरू झाल्या. काल दिवसभरात ६९ उड्डाणे रद्द झाली असून, प्रवाशांना रिफंड आणि पर्यायी फ्लाइट्ससाठी वाट पाहावी लागली. विमानतळ व्यवस्थापनाने २०० अतिरिक्त खुर्च्या आणि खाद्यपदार्थांचा मुबलक साठा केला असला तरी गर्दीमुळे हाल झाले. देशभरात शनिवारी ८५० हून अधिक उड्डाणे रद्द झाली असून, बेंगलुरू (१२४), दिल्ली (१०६), मुंबई (११७) आणि हैदराबाद (६६) हे सर्वाधिक प्रभावित. इंडिगोने हिवाळी वातावरण, सॉफ्टवेअर ग्लिच आणि वेळापत्रक बदल ही कारणे सांगितली, पण जाणकारांच्या मते FDTL नियमांची अंमलबजावणी ही मुख्य कारण आहे.


