मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राजकीय वातावरण तापले आहे. विधान परिषदेच्या सभापती प्रा. राम शिंदे यांच्या विरोधी पक्षनेतेपदाबाबतच्या वादग्रस्त विधानावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. शिंदे यांच्या विधानाला ‘दुर्दैवी’ आणि ‘लोकशाही मूल्यांचा अवमान’ करणारे असल्याचे म्हणत रोहित पवार यांनी त्यांना सार्वजनिक माफी मागण्याची मागणी केली आहे.
दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेते पद रिक्त असल्याबाबत बोलताना शिंदे यांनी म्हटले होते की, स्वातंत्र्यानंतर सुरू झालेल्या प्रथा आज सुरू असणं अभिप्रेत आणि अपेक्षित नाही. या विधानावर रोहित पवार यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत सांगितले, सभापती राम शिंदे यांचे हे विधान अत्यंत दुर्दैवी आहे. हाच निकष विधानपरिषदेलाही लावणार का? विधानपरिषदेची स्थापना ही स्वातंत्र्यापूर्वी १९३५ च्या भारत सरकार कायद्यानुसार तत्कालीन मुंबई प्रांतात झाली होती, असं ते म्हणाले.
पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले, संवैधानिक पदावरील व्यक्तीने विरोधी पक्षनेतेपदाबाबत असं विधान करणं हे केवळ चुकीचंच नाही तर लोकशाहीचा अनादर करणारं आहे. याबाबत त्यांनी माफी मागितली पाहिजे. या वादाने विधानसभेच्या सत्रापूर्वीच विरोधी पक्ष आणि सत्ताधारी महायुतीमध्ये तणाव वाढला आहे.
विरोधी पक्षनेतेपद रिक्त; काँग्रेसची टीका
महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच विधानसभेत आणि विधान परिषदेत विरोधी पक्षनेते पद रिक्त आहे. विधान परिषदेसाठी काँग्रेसने सतेज पाटील यांच्या नावाचा प्रस्ताव दिला असला तरी अद्याप निर्णय झालेला नाही. काँग्रेसचे विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार हल्ला चढवला. “विरोधी पक्षनेते हे संवैधानिक पद आहे, तरीही त्यावर नेमणूक होत नाही. हे सरकार संविधानविरोधी आहे,” असे म्हणत वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱीवर संविधानाच्या अवमानाचा आरोप केला.


