Today Weather Update : महाराष्ट्रात उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरीमुळे पुन्हा एकदा गारठा वाढला आहे. धुळे येथील कृषी महाविद्यालयात यंदाच्या हिवाळ्यातील राज्यातील सर्वात नीचांकी ५.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यवतमाळमध्ये ८.८ अंश, तर मालेगावमध्ये ९ अंश तापमान नोंदले गेले. नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, अमरावती, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आदी जिल्ह्यांतही पारा लक्षणीयरीत्या घसरला असून पहाटे दाट धुके आणि हुडहुडीचा अनुभव नागरिकांना येत आहे.
हवामान विभागाने पूर्व विदर्भातील वर्धा, नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यांसाठी थंडीच्या लाटेचा येलो अलर्ट जारी केला आहे. आजपासून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा भागात थंडीच्या तीव्र लाटेची शक्यता वर्तवली असून अधिक सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
किमान तापमान १० अंशांपेक्षा खाली आणि सरासरीपेक्षा ४.५ अंश किंवा त्याहून अधिक घट झाल्यास थंडीची लाट घोषित केली जाते. रविवारी धुळे, निफाड, परभणी, अमरावती आणि यवतमाळमध्ये थंडीची लाट होती. बदलत्या हवामानामुळे नागरिक हैराण झाले असून रस्त्यांवर शेकोट्या पेटवताना आणि गरम कपड्यांचा आधार घेताना दिसत आहेत. दिवसाच्या वेळी मात्र तापमानात वाढ होत असल्याने विरोधाभासी हवामानाचा अनुभव येत आहे.


