नागपूर : महाराष्ट्र विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी (९ डिसेंबर) विरोधी पक्षनेते पदावरून राजकीय घमासान तीव्र झाले आहे. शिवसेना (शिंदे गट) ने ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांना विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी जोरदार विरोध केला असून, भाजपकडूनही महाविकास आघाडी मध्ये फूट पाडण्यासाठी ‘गुगली’ टाकली गेली आहे. भाजपने काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांना विधानसभेचे आणि ठाकरे गटाचे अनिल परब यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पदाची ऑफर दिल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे मविआतील एकजूट धोक्यात असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
मविआकडून विधानसभेसाठी भास्कर जाधव आणि विधान परिषदेसाठी काँग्रेसचे सतेज पाटील यांच्या नावांवर एकमत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, शिंदे गटात जाधव यांना विरोधी पक्षनेते पद मिळता कामा नये, असा मतप्रवाह आहे. यामुळे भाजपने वडेट्टीवार आणि परब यांच्या नावांवर नव्याने चर्चा सुरू केली असल्याचे सूत्रांनी सांगितले. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला जाधव आणि वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली होती, पण आता ही स्थिती मविआसाठी धोकादायक ठरत आहे.
विरोधी पक्षनेते पद रिक्त का? महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच
सरकार स्थापन झाल्यापासून (डिसेंबर २०२४) विधानसभा आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पदे रिक्त आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच अधिवेशन हे विरोधी पक्षनेत्याविना होत असल्याचा दावा मविआ नेत्यांनी केला आहे. वडेट्टीवार यांनी म्हटले की, “सत्ताधारी पक्षाचे प्रमुख म्हणजे मुख्यमंत्री, तर विरोधी पक्षाचा चेहरा म्हणजे विरोधी पक्षनेते. ही पदे रिक्त ठेवून लोकशाहीची इभ्रत धोक्यात आहे.


