Solapur Crime News : दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर गावात सोमवारी (८ डिसेंबर) दुपारी ऊसतोड शेतातच एका विवाहितेची तिच्याच पतीने कोयत्याने वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. अनैतिक संबंधांना सतत विरोध करणाऱ्या पत्नीला कंटाळून पती रागाच्या भरात बेभान झाला आणि निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाने परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.
मृत महिलेचे नाव सविता जकप्पा पुजारी (वय ३५, मूळ रा. हत्ताळी, ता. चडचण, जि. विजयपूर, कर्नाटक) असे आहे. तिचा पती जकप्पा मणगेरी पुजारी (वय सुमारे ४०) हा ऊसतोड कामगार आहे. कर्नाटकातील विजयपूर जिल्ह्यातील एका महिलेसोबत जकप्पाचे अनैतिक संबंध असल्याची बाब सविताला समजली होती. यावरून गेल्या अनेक दिवसांपासून दाम्पत्यात सतत भांडणे होत होती.
काही दिवसांपूर्वी जकप्पा-सविता हे दाम्पत्य वडापूर येथील दत्तात्रय गणेशकर यांच्या शेतात ऊसतोड कामासाठी आले होते. सोमवारी दुपारी पुन्हा एकदा अनैतिक संबंधाच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. वाद इतका तीव्र झाला की, जकप्पा रागाच्या भरात शेतात ठेवलेला कोयता घेऊन सवितावर तुटून पडला. त्याने सविताच्या डोक्यावर आणि गळ्यावर सलग वार करून तिची हत्या केली. घटनास्थळीच सविताचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच मंद्रूप पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर उधार, पोलीस उपनिरीक्षक राजकुमार डांगे, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्यासह पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी खून करण्यात वापरलेला कोयता जप्त केला असून आरोपी जकप्पाला अटक केली आहे. या प्रकरणी ऊसतोड कामगार दादागोंड महादेव कट्टीमनी (रा. सातपूर, ता. इंडी, जि. विजयपूर) यांनी मंद्रूप पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजकुमार डांगे करीत आहेत.


