मुंबई: चित्रपट अभिनेता सैफ अली खान याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला आहे. तो जखमी झाला आहे. त्याला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सैफ खारच्या फॉर्च्यून हाइट्समध्ये राहतो. त्याचे घर 11व्या मजल्यावर आहे. सैफ अली खानच्या या घरात चोर शिरल्याचे बोलले जात आहे. यावेळी एका चोराने सैफवर हल्ला केला, त्यात तो जखमी झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सैफच्या घरात एक चोर घुसला होता. यावेळी काही नोकर झोपेतून जागे झाले. त्यांनी जोरात आवाज केल्याने सैफ अली खान ही जागा झाला आणि तो बाहेर आला. त्याने चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, चोरट्याने सैफवर चाकूने हल्ला केला. त्यामध्ये तो जखमी झाला. घरातील नोकर आणि काही सदस्य सैफला रुग्णालयात घेऊन गेले.सैफची दुखापत गंभीर नाही, ही दिलासादायक बाब आहे.
पोलीस काय म्हणाले?
या घटनेबाबत मुंबई पोलिसांचे म्हणणे समोर आले आहे. पोलिसांनी सांगितले की, रात्री उशिरा अज्ञात व्यक्तीने अभिनेता सैफ अली खानच्या घरात घुसून त्याच्या मोलकरणीसोबत वाद घातला. जेव्हा अभिनेत्याने हस्तक्षेप करून त्या व्यक्तीला शांत करण्याचा प्रयत्न केल. तेव्हा त्याने सैफ अली खानवर हल्ला करून त्याला जखमी केले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
करीना आणि मुले सुरक्षित
सैफची पत्नी अभिनेत्री करीना कपूर आणि तिची मुले सुरक्षित आहेत. या घटनेबाबत कुटुंबाने अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी केलेले नाही. दरम्यान, घटनेनंतर चोरटा फरार झाला आहे. मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेचे पथक त्याला पकडण्यात व्यस्त आहे. घराभोवती लावण्यात आलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.


